नवी दिल्ली - केंद्रातील सत्तेला 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मोदी सरकारनं आपले रिपोर्ट कार्ड सादर केले. मोदी सरकारच्या या रिपोर्ट कार्डवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना 'F' ग्रेड देत निशाणा साधला आहे. 4 वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकार असंख्य कार्य, मोर्चेबांधणीमध्ये अपयशी ठरल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारला ग्रेड्सदेखील दिले आहेत. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर 'फेल' ठरल्याचे सांगत, राहुल गांधींनी त्यांना 'F' ग्रेड दिले आहे.
राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून जारी केलेले मोदी सरकारवरील स्वत:चे रिपोर्ट कार्डमध्ये कृषी, परराष्ट्र धोरण, इंधनाचे दर आणि रोजगार निर्मितीमध्ये मोदी सरकारला 'एफ' म्हणजेच 'फेल' ग्रेड दिले आहे. मात्र, घोषणाबाजी आणि जाहिरातबाजीमध्ये हे सरकार आघाडीवर असल्याचा टोला हाणत 'ए प्लस' ग्रेड राहुल गांधी यांनी दिला आहे. महत्त्वाच्या मुद्यांवर मोदी सरकार सपशेल अपयशी ठरलं असलं तरी लोकांना आकर्षित करण्यात मात्र अव्वल ठरल्याचं टीकास्त्रही राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सोडले आहे.