अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. आपला पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्येही त्यांनी दौरे वाढवले आहेत. मात्र अमेठी दौऱ्यादरम्यान त्यांना विरोधाचा सामना करावा लागला, राहुल गांधी इटलीला जा, अशी घोषणाबाजी काही शेतकऱ्यांनी केली. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन राजीव गांधी फाउंडेशनला देण्यात आलेली आहे. ही जमीन आम्हला परत द्या किंवा आम्हाला नोकऱ्या तरी द्या, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली. आंदोलनकर्ते शेतकरी हे गौरीगंज येथील रहिवासी असल्याचे वृत्त आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याने एएनआयला सांगितले की, राहुल गांधीमुळे आम्ही खूप दु:खी आहोत. त्यांनी आमची जमीन हडप केली आहे. त्यांनी परत इटलीला निघून जावे.'' या शेतकऱ्यांनी सम्राट सायकल कारखान्यासमोर आंदोलन केले. या कारखान्याची पायाभरणी राजीव गांधी यांनी केली होती. मात्र येथील जमिनीबाबत 1980 पासून विवाद सुरू आहे. 1980 साली जैन बंधूंनी कंपनी सुरू करण्यासाठी कौसार येथील ही जमीन घेतली होती. पुढे न्यायालयाने ही जमीन उत्तर प्रदेश औद्योगिक विकास प्राधिकरणाकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. मात्र राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने अद्याप या जमिनीवरील ताबा सोडलेला नाही.
राहुल गांधी इटलीत जा! अमेठीत शेतकऱ्यांची घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 1:59 PM
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांकडून विरोधाचा सामना करावा लागला आहे.
ठळक मुद्देकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांकडून विरोधाचा सामना करावा लागला राहुल गांधी इटलीला जा, अशी घोषणाबाजी काही शेतकऱ्यांनी केलीशेतजमिनीच्या विवादामुळे राहुल गांधी शेतकऱ्यांवर नाराज