ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा परदेश दौ-यावर चालले आहेत. यावेळी सुट्ट्यांच्या निमित्ताने राहुल गांधी आपल्या आजीच्या घरी चालले आहेत. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून आपण फिरायला चाललो असल्याची माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनी लिहिलं आहे की, "माझी आजी आणि कुटुंबाला भेटण्यासाठी काही दिवसांसाठी जात आहे. त्यांच्यासोबत काही वेळ घालवणार आहे".
राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून सक्रिय आहेत. मध्यप्रदेशातील मंदसौर येथे झालेल्या हिंसाचारानंर राहुल गांधी पीडितांच्या कुटुंबांना भेटण्यासाठी निघाले होते. यावेळी रस्त्यातच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. याआधी सहारनपूरमधील हिंसाचारानंतर देखील राहुल गांधी पीडितांना भेटण्यासाठी गेले होते.
Will be travelling to meet my grandmother & family for a few days. Looking forward to spending some time with them!— Office of RG (@OfficeOfRG) June 13, 2017
राहुल गांधी अशावेळी सुट्ट्यांवर जात आहेत, जेव्हा राष्ट्रपती निवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याआधीही राहुल गांधी नवीन वर्ष साजरं करण्यासाठी राहुल गाधी परदेशी गेले होते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी नेहमी परदेश दौ-यावर जात असतात. याच मुद्द्यावरुन अनेकदा विरोधकांनी त्यांना टार्गेट केलं आहे. भाजपाने तर त्यांना पार्ट टाईम राजकारणी असल्याचा टोलाही हाणला होता. राहुल गांधी महत्वाच्या वेळी पक्षाची साथ सोडून सुट्ट्यांवर जातात असा आरोप भाजपाने केला होता. यावरुन पक्षांतर्गत नाराजी असल्याचंही सुत्रांकडून कळलं होतं. राहुल गांधी राजकारणाला गंभीरपणे घेत नसल्याचा आरोपही वारंवार झाला आहे. 2015 रोजी राहुल गांधी अचानक सुट्ट्यांवर गेले, ज्यानंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात आले होते.