नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात आक्रमक झाल्याने काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. आता 2019 च्या निवडणुकीत मोदींविरोधात लढण्यासाठी राहुल गांधी यांना ब्रह्मास्त्र मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस केंब्रिज एनालिटिका नावाच्या प्रसिद्ध कंपनीच्या संपर्कात आहे. या कंपनीने गतवर्षी अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती. केंब्रिज अॅनॅलिटिका ग्राहकांच्या इंटरनेट डेटाचे विश्लेषण करून लोकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचे काम करते. तसेच लोकांचे प्रश्न काय आहेत. त्यांच्या अपेक्षा काय आहेत. याची माहिती घेते. जेणेकरून त्यांच्या नेत्याला त्या हिशेबाने आपली रणनीती आखता येते. या विश्लेषणासाठी ऑनलाइन सर्च, ईमेल इवढेच नव्हे तर शॉपिंग वेबसाइट्सचासुद्धा धांडोळा घेतला जातो. 2014 साली भाजपा सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करून प्रचार करत असल्याचे समोर आल्यावर राजकीय तज्ज्ञांनी त्याला फार महत्त्व दिले नव्हते. भारतातील ग्रामीण जनतेचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे त्यांचे मत होते. मात्र त्या निवडणुकीतील भाजपाच्या विजयामुळे सर्वांना सोशल मीडियाचा विचार करणे भाग पाडले होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मोठी आघाडी उघडली आहे. नोटाबंदी, जीएसटी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फसलेले निर्णय असून यामुळे शेतकरी, छोटया दुकानदारांचे नुकसान झाले आहे. देशभरात शेतकरी आत्महत्या करत असून, शेतक-यांच्या जमिनी हिसकावून घेणे हे मोदींसाठी फक्त दोन मिनिटांचे काम आहे अशा शब्दात राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. तीन दिवसांच्या गुजरात दौ-यावर असलेले राहुल गांधी आज खेडामध्ये एका जनसभेला संबोधित करत होते. जीएसटी लागू करण्याचा छोटया उद्योगांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. मोदी सरकार फक्त उद्योगपतींना मदत करत आहे. नरेंद्र मोदी फक्त मन की बात करतात अशी टीका राहुल यांनी केली. गुजरातमध्ये विकासला काय झालंय? तो कसा वेडा झाला ? सतत खोटं बोलणं ऐकून विकास वेडा झाला असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच गुजरात मॉडेल पूर्णपणे फेल झालं आहे. काँग्रेस गुजरातमध्ये सत्तेवर आली तर, आम्ही तुमच्याकडे लक्ष देऊ असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यासोबत हिंदुत्व कार्डही खेळत आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींविरोधात राहुल गांधींना मिळाले ब्रह्मास्त्र?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 7:22 PM