Mulayam Singh Yadav, Rahul Gandhi: समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. मुलायम सिंह यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या सैफई या गावी नेण्यात आले, तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुलायम सिंह यांच्या निधनानंतर देशातील सर्व नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीही मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेत असताना त्यांना मुलायम सिंह यादव यांच्या निधनाची माहिती मिळाली. यानंतर यात्रा आटोपून भारत जोडो यात्रेतच श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. तेथे राहुल गांधी यांनी मुलायम सिंह यादव यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा देशभरात काढली आहे. त्या यात्रेच्या माध्यमातून ते भाजपा सरकारवर आसूड ओढताना दिसत आहेत. बऱ्याच ठिकाणी त्यांची आक्रमक भूमिकाही पाहायला मिळाली आहे. पण या हळव्या प्रसंगी राहुल गांधींसोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल, दिग्विजय सिंह आणि रणदीप सुरजेवाला यांनी मुलायमसिंह यांची श्रद्धांजली सभा आयोजित करून त्यांनी आदरांजली वाहिली.
राहुल गांधींनी ट्विट करून मुलायमसिंह यादव यांना तळागाळातील राजकारणाशी निगडित प्रमुख नेते म्हणून त्यांचे स्मरण केले. राहुल गांधी यांनी ट्विट केले, "मुलायम सिंह यादव जी यांचे निधन ही अत्यंत दु:खद बातमी आहे. तळागाळातील राजकारणाशी निगडित ते खरे व महत्त्वाचे योद्धे होते. मी अखिलेश यादव यांच्यासह सर्व शोकाकूल कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो."
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही मुलायम सिंह यादव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. सोनिया गांधी यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, मुलायम सिंह यादव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. देशाचे संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान नेहमीच अविस्मरणीय राहील. त्याहीपेक्षा त्यांचा दीन-दलितांसाठी केलेला संघर्ष सदैव स्मरणात राहील. जेव्हा देशाच्या घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्याची गरज होती, तेव्हा काँग्रेसला त्यांच्याकडून नेहमीच पाठिंबा मिळाला आहे. अखिलेश यादव आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत.