नवी दिल्ली: राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील उगवता तारा असून 2019 नक्कीच वेगळी परिस्थिती असेल, असा विश्वास काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी सिद्धू यांनी म्हटले की, मी माझे जीवन राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अर्पण केले आहे. राहुल भाई हे भारतीय राजकारणातील उगवता तारा आहेत. 2019 मध्ये निश्चितच वेगळी परिस्थिती पाहायला मिळेल. अन्य राजकीय पक्ष राहुल यांना पाठिंबा देतील. जोपर्यंत माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेल तोपर्यंत मी राहुल गांधींसोबत असेन, असे सिद्धू यांनी सांगितले.कर्नाटकमध्ये भाजपाने आघाडी घेतली असून बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे या विजयाबरोबरच भाजप आघाडीची २२ राज्यात सत्ता निर्माण झाली आहे. यापूर्वीच १५ राज्यात भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केले असून त्यात आता कर्नाटकची भर पडल्याने हा आकडा १६ वर जाणार आहे. कर्नाटक हातचे गेल्याने आता मिझोराम, पंजाब आणि पुदुचेरी या तीन राज्यांतच काँग्रेसची सत्ता उरली आहे. कर्नाटक निकालानंतर देशाच्या ६४.१४ टक्के लोकसंख्येवर एनडीएची, २.४९ टक्के लोकसंख्येवर काँग्रेसची तर २८ टक्के लोकसंख्येवर इतरांची सत्ता असल्याचं स्पष्ट झाले आहे.
राहुल भाई तर उगवता तारा; 2019 मध्ये वेगळी परिस्थिती असेल- नवज्योतसिंग सिद्धू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 2:06 PM