ग्वाल्हेर : विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या मध्य प्रदेशमध्ये मंदिर, मशीद यांना भेटी दिल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील दाता बंदी छोर गुरुद्वारामध्ये जाऊन तेथे दर्शन घेतले.
ते या राज्याच्या दोन दिवसांच्या प्रचार दौऱ्यावर आले असून, त्यांनी मंगळवारी सकाळी काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या गुरुद्वारात गेले असता तेथील मुख्य ग्रंथीने राहुल गांधी यांना एक तलवार भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ व खासदार ज्योतिरादित्य शिंदेही उपस्थित होते.
दाता बंदी छोर गुरुद्वारात जाताना या तीनही नेत्यांनी आपल्या डोक्याला सरोपा बांधला होता. राहुल गांधींनी या दौºयात सोमवारी रात्री मोती मशीदला भेट दिली होती. त्याच दिवशी सकाळी दतिया येथील पीतांबर पीठ मंदिरामध्ये जाऊन त्यांनी देवदर्शन घेतले होते.
हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र असलेली कैलास मानसरोवर यात्रा राहुल यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये केली होती. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी ते अमेठी दौºयावर गेले असता तेथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागतफलकांवर त्यांचा उल्लेख ‘शिवभक्त’ असा केला होता. हर हर महादेव, बम बम भोलेच्या जयघोषात कनवारिया यांनी त्यांचे स्वागत केले होते.सर्वांना आपलेसे करण्यासाठी..!
मध्य प्रदेशमध्ये २८ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. समाजातील सर्वधर्म, वर्गाच्या लोकांना आपलेसे करण्यासाठी राहुल गांधी यांनी प्रयत्न चालविले आहेत. विविध धर्मांच्या प्रार्थना स्थळांना भेटी देणे हा त्याचाच भाग आहे. राहुल गांधी यांच्या आगामी दौºयांमध्येही त्यांच्या धार्मिकतेचे दर्शन घडण्याची शक्यता आहे.