Rahul Gandhi, Veer Savarkar BJP: "राहुल गांधींच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते"; भाजपाकडून पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 07:06 PM2022-10-08T19:06:53+5:302022-10-08T19:07:50+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटीशांकडून स्टायपंड घेत असल्याचा राहुल गांधींचा दावा
Rahul Gandhi, Veer Savarkar BJP: काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू असताना आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल एक विधान करून नवा वाद ओढवून घेतला. कर्नाटकातील तुमकुरु येथील मायासांद्रामध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि वीर सावरकर यांच्याबाबत विधाने केली. "मला असे वाटते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना इंग्रजांना मदत करत होती आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्रजांकडून मानधन (स्टायपंड) मिळत होते. स्वातंत्र्यलढ्यात भाजपा कुठेच नव्हता," असे विधान त्यांनी केले. त्यावर आता भाजपाकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
भाजपाकडून सडेतोड प्रत्युत्तर
"राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेले विधान पाहता त्यांच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते. तसेही ते भारतात फारसे नसतात. अचानक कुठे परदेशी जातात हे काँग्रेसवाल्यांनाही माहिती नसते. आता भारतात आहेत तर देशाबद्दलचे अज्ञान दाखवीत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रखर देशभक्तीबद्दल प्रत्येक भारतीयाला आदर आहे. सावरकरांनी देशासाठी केलेल्या असीम त्यागाबद्दल राहुल गांधी यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. ‘भारत जोडो‘ यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी देश तोडण्याचे काम करीत आहेत", अशी खरमरीत टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
राहुल गांधी काय म्हणाले?
"स्वातंत्र्य लढ्यात भाजप कुठेही नव्हता ही वस्तुस्थिती भाजपावाले लपवू शकत नाहीत. मला असे वाटते की RSS इंग्रजांना मदत करत होती आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्रजांकडून मानधन मिळायचे. काँग्रेस आणि पक्षाचे नेते स्वातंत्र्यासाठी लढले आहेत. आम्ही फॅसिस्ट पक्ष नाही. आमचा पक्ष संवादावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. सध्या निवडणूक जिंकण्यासाठी संच म्हणून काम करावे लागेल, हे आम्हाला माहीत आहे. देशात द्वेष आणि हिंसाचार पसरवणे हे देशविरोधी कृत्य आहे. द्वेष आणि हिंसाचार पसरवणाऱ्यांशी आम्ही लढणार आहोत," असे विधान राहुल गांधी यांनी केले.