जगातील सर्वात शक्तिशाली नेते सध्या भारतात असून जी-२० चा कार्यक्रम दिल्लीत पार पडत आहे. जी-२० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीतीलभारत मंडपम येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इंग्लंडचे पंतप्रधान यांच्यासह अनेक देशांचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित आहेत. या भव्य कार्यक्रमासाठी राजधानी दिल्लीत सजावट करण्यात आली आहे. मोठमोठे पडदे आणि फलक लावून काही भाग झाकण्यात आला असल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीकास्त्र सोडले. "देशात येणाऱ्या पाहुण्यांपासून सरकार गरीब आणि जनावरांना लपवत आहे. सरकारला भारताचे वास्तव आमच्या पाहुण्यांपासून लपवण्याची गरज नाही", असे राहुल गांधींनी म्हटले. दिल्लीत होत असलेल्या जी-२० शिखर बैठकीसाठी मागील अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे. अशा स्थितीत शहरातील काही भागात ज्या ठिकाणी गरीब वस्त्या आहेत, तेथे मोठे पडदे लावण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरून राहुल यांनी सरकारला डिवचले.
राहुल गांधी युरोप दौऱ्यावर अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दिल्लीच्या काही भागांत हिरवे पडदे लावण्यात आल्याचे दिसते. याबाबत सोशल मीडियावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राहुल गांधी आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी युरोपला गेले आहेत. राहुल गांधी यांनी ब्रुसेल्समध्ये युरोपीयन संसदेच्या काही सदस्यांची बैठक घेतली.
दरम्यान, जी-२० शिखर परिषद सुरू आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच या संमेलनाचे आयोजन होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेच्या सुरुवातीला सर्व देशांच्या नेत्यांचे, प्रमुखांचे स्वागत केले. तसेच भारतात जी-२० जनतेची परिषद झाली, कोट्यवधी भारतीय या परिषदेशी जोडले गेले, असे नमूद केले.