नवी दिल्ली: देशातील बलात्काराच्या घटनांवर भाष्य करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी वापरलेल्या 'रेप इन इंडिया' शब्दांवरुन संसदेत गदारोळ झाला. भाजपाच्या महिला खासदारांसह अनेकांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. राहुल यांचं संसद सदस्यत्व काढून घेण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आलं. मात्र यानंतर राहुल यांनी माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं. आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं ते म्हणाले. नरेंद्र मोदी दिल्लीला रेप कॅपिटल म्हणाले होते, याची आठवणदेखील त्यांनी करुन दिली होती. संसदेच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधींनी रेप इन इंडियावरुन माफी मागण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. दिल्ली रेप कॅपिटल झाल्याचं विधान पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्याची व्हिडीओ क्लिप माझ्याकडे आहे. ती व्हिडीओ क्लिप मी ट्विटरवर शेअर करेन, असं राहुल गांधी म्हणाले. यानंतर लगेचच त्यांनी मोदींच्या त्या विधानाची क्लिप ट्विटदेखील केली. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन ईशान्य भारत पेटला आहे. त्यावरुन लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपानं रेप इन इंडियाच्या विधानावरुन वाद निर्माण केल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून ईशान्य भारत धगधगतो आहे. आर्थिक मंदी, बेरोजगारीचे प्रश्न आ वासून उभे आहेत. यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून वाद निर्माण केला जात आहे. मात्र मी माझ्या विधानावर ठाम आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, असं म्हणत राहुल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र मोदींनी दिल्लीचा उल्लेख रेप कॅपिटल असा केला होता. त्यावर भाष्य करताना पंतप्रधान मेक इन इंडियाची भाषा करतात. मात्र जिथं पाहावं तिथं रेप इन इंडिया झाला आहे, असं मी म्हटलं होतं, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला.संसदेपाठोपाठ ट्विटरवर राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं. दिल्ली रेप कॅपिटल झाली आहे, या पंतप्रधानांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत राहुल यांनी मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली. ईशान्य भारत पेटवल्याबद्दल, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याबद्दल आणि दिल्लीला रेप कॅपिटल म्हणाल्याबद्दल माफी मागा, असं राहुल यांनी म्हटलं आहे.