राहुल गांधींनी धारण केली रुद्राक्षांची माळ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 10:53 PM2017-12-12T22:53:04+5:302017-12-12T23:48:18+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या कडव्या हिंदुत्वावर मात करण्यासाठी काँग्रेस आणि राहुल गांधींनी सौम्य हिंदुत्वाची कास पकडली होती.दरम्यान राहुल गांधींनी आता चक्क रुद्राक्षाची माळसुद्धा धारण केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या कडव्या हिंदुत्वावर मात करण्यासाठी काँग्रेस आणि राहुल गांधींनी सौम्य हिंदुत्वाची कास पकडली होती.दरम्यान राहुल गांधींनी आता चक्क रुद्राक्षाची माळसुद्धा धारण केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी गुजरातमधील जगन्नाथ मंदिरात दर्शन घेऊन परतलेल्या राहुल गांधी यांच्या गळ्यात रुद्राक्षांची माळ असल्याचे छायाचित्रांमधून दिसत आहे. देवदर्शन घेऊन परतल्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान एका छायाचित्रकाराने राहुल गांधी यांच्या गळ्यातील रुद्राक्षांसारखी दिसणारी माळ टिपली आहे. राहुल गांधींच्या गळ्यात प्रथमच अशी माळ दिसत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी या सुद्धा रुद्राक्षांची माळ धारण करणे पसंत करत असत.
रुद्राक्षांची माळ ही भगवान शिवशंकराशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यामुळे शिवभक्त अशी रुद्राक्ष माळ धारण करतात. दरम्यान काही दिवसांपूर्वीच माझे कुटुंब शिवभक्त असून, आपणही त्याच मार्गाने जात असल्याचे म्हटले होते. इंदिरा गांधी यांची शिवशंकरावर श्रद्धा होती. त्या नेहमी रुद्राक्षांची माळ धारण करत असत. आज जगन्नाथ मंदिरात पूजा केल्यानंतर राहुल गांधी यांना ही रुद्राक्षांची माळ प्रसाद स्वरूपात मिळाली असावी,. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Has #RahulGandhi started wearing #Rudraksha beads?
— ANI Digital (@ani_digital) December 12, 2017
Read @ANI story | https://t.co/IgGaxiBl2upic.twitter.com/iXqBDIJRH1
गुजरात निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून राहुल गांधी यांनी मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शनाचा धडाका लावला आहे. आतापर्यंत त्यांनी गुजरातमधील सर्व प्रमुख मंदिरांना भेट दिली आहे. तर राहुल गांधी हिंदू मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी देवदर्शन करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
दरम्यान, विकासाच्या मुद्यावरून घसरून वैयक्तिक टीकाटिप्पणीपर्यंत पोहोचलेला गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी थांबला. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचे मतदान 14 डिसेंबर रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 93 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून, मतमोजणी 18 डिसेंबरला होणार आहे.
गुजरातमधील सत्ता कायम राखण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पणाला लावलेली प्रतिष्ठा, राज्यात दीर्घकाळानंतर सत्तेत पुनरागमन करण्यासाठी काँग्रेसने कसलेली कंबर आणि पटेलांची नाराजी इव्हीएम मशीनमधून व्यक्त होण्यासाठी हार्दिक पटेल यांनी लावलेला जोर यामुळे गुजरात विधानसभेचा प्रचार बऱाचा गाजला. आता हा गुजराती मतदार दुसऱ्या टप्प्यात कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतो आणि गुजरातमध्ये कुणाचे सरकार बनवतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल.