Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी आजचा दिवस खुप खास आहे. मोदी आडनाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडूनराहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने शुक्रवारी राहुल गांधी यांच्या बाजूने निकाल देत शिक्षेला स्थगिती दिली आहे. याच प्रकरणात राहुल यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. या निकालानंतर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ‘प्रेमाचा द्वेषावर विजय’ असे ट्विट करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, काँग्रेसने सलग दोन ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. पहिल्या ट्विटमध्ये काँग्रेसने लिहिले की, ‘द्वेषाच्या विरोधात प्रेमाचा विजय आहे’. दुसर्या ट्विटमध्ये काँग्रेसने राहुल गांधींचा संसदेतील जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी अदानी आणि मोदी यांचा फोटो दाखवलो होता. काँग्रेसने या फोटोसोबत लिहिले की, 'मी येत आहे, प्रश्न सुरुच राहणार.'
दरम्यान, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, आजच लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून त्यांची भेट घेणार आहे. या निर्णयावर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. न्यायालयापेक्षा कोणीही मोठा नाही, हे न्यायालयाने सिद्ध केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देऊन लोकशाहीचा आवाज बळकट केल्याचे पायलट यांनी म्हटले आहे.