कर्नाटकमध्ये भाजपात प्रचंड मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. भाजपाचे मुख्यमंत्री, केंद्रातून पाठविलेले नेते शनिवारी रात्री उशिरा घरी येऊनही माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी बंडखोरी केली आहे. आज त्यांनी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगड़े कागेरी यांना आमदारकीचा राजीनामा दिला आहे. हीच संधी साधून काँग्रेसने शेट्टर यांना पक्षात सहभागी होण्याचा निमंत्रणही दिले आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आज कोलारमध्ये सभा होत आहे. कर्नाटक निवडणूक प्रचाराचा नारळ आणि मोदी आडनावावरून खासदारकी गेली, ते वक्तव्य केलेला मतदारसंघ असा दुहेरी योगायोग राहुल यांनी साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच शेट्टर काँग्रेसमध्ये यायचे नक्की झाले की त्यांना याच सभेत प्रवेश देण्याचाही तयारी काँग्रेस करत आहे. यासाठी बंगळुरूमध्ये प्रायव्हेट जेट तयार ठेवण्यात आले आहे.
लिंगायत समाजाचा प्रभाव असलेल्या कर्नाटकच्या या भागात शेट्टर यांचा वरचश्मा आहे. गेली तीस वर्षे शेट्टर भाजपात राहुन काम करत होते. त्यांनी या भागात भाजपा वाढविली. ६७ वर्षांचे असूनही भाजपाने त्यांचे तिकीट कापले होते. यामुळे ते नाराज होते. आता भाजपाकडे लिंगायत समाजाचा वरिष्ठ असा प्रभावी नेता नाही. येडीयुराप्पा यांनाही भाजपाने घरी बसविले आहे. यामुळे याच परिस्थितीची संधी काँग्रेस घेऊ पाहत आहे.
शेट्टर यांचे 'प्रामाणिक मुख्यमंत्री' असे वर्णन करताना काँग्रेस नेते हरिप्रसाद म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर कोणतेही आरोप नव्हते. यामुळे शेट्टर जर काँग्रेसमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पक्षात ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्यांना उमेदवारी न देण्यावर कोणतेही षडयंत्र नव्हते, असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी केला आहे.
एमबी पाटील, सिद्धरामय्या, डीके शामनूर हे तिघेही शेट्टर यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधी सध्या कोलारमध्ये असल्याने इतर नेतेही त्यांच्यासोबत व्यस्त आहेत.