काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या नेपाळच्या खासगी दौऱ्यावर आहेत. ते नेपाळी मैत्रिण सुमनिमा उदास यांच्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी काठमांडू येथे गेले आहेत. यावर तेथील एका प्रसिद्ध पबमधील राहुल यांचा एका तरुणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरून देशात वादळ उठले आहे.
राहुल गांधी Lord Of The Drinks नाईट क्लबमध्ये गेले होते. तिथे त्यांचा एका तरुणीसोबतचा व्हिडीओ आला आहे. तिच्याशी ते बोलताना दिसत आहेत. सुमनिमाचे वडील आणि म्यानमारमध्ये नेपाळचे राजदूत भीम उदास यांनी सांगितले की, आम्ही राहुल गांधी यांना माझ्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते. हा विवाह सोहळा मंगळवारी होणार आहे, तर ५ मे रोजी रिसेप्शन होणार आहे. सुमनिमा यांचा विवाह नीमा मार्टिन शेरपा यांच्यासोबत होणार आहे. रिपोर्टनुसार भारतातील अनेक व्हीआयपी मंडळीही या विवाह सोहळ्यासाठी नेपाळमध्ये दाखल झाली आहे.
मात्र ही तरुणी कोण असा प्रश्न साऱ्यांना पडलेला असताना तिच्याशी एक मिळताजुळता फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये ती नेपाळमधील चिनी राजदूत असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावरील अनेक युजरसह भाजपच्या काही नेत्यांनी ही महिला चिनी राजनैतिक अधिकारी हौ यान्की आहे असा दावा केला आहे. याची अनेक ट्विट व्हायरल झाली आहेत. हौ यान्की ही 2018 पासून नेपाळमध्ये चीनची राजदूत म्हणून काम करत आहे. या बाबतचे वृत्त आज तकने दिले आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, राहुल गांधी त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडूला गेले असून ही त्यांची निव्वळ वैयक्तिक भेट आहे. लग्न आणि लग्न समारंभाला उपस्थित राहणे ही आपली संस्कृती आणि सभ्यतेची बाब आहे.