Rahul Gandhi In Raibareli : यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून काँग्रेसने जोरदार कमबॅक केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली, अशा दोन ठिकाणाहून मोठा विजय मिळवला. यानंतर आज त्यांनी रायबरेलीत आभार सभेचे आयोजन केले. यावेळी प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना राहुल यांनी रायबरेली आणि अमेठीच्या कार्यकर्त्यांचे, मतदारांचे आभार मानले, याशिवाय प्रियंका गांधींचे नाव घेत पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली.
आमची सेना संसदेत...राहुल गांधी म्हणाले, रायबरेली आणि अमेठीच्या जनतेने दिलेले प्रेम मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मी रायबरेलीचा खासदार आहे, पण मी वचन दिले होते की, जो विकास रायबरेलीचा होईल, तोच अमेठीचा होईल. निवडणुकीत भारतातील जनतेने मोदींना प्रत्युत्तर दिले, याची सुरुवात तुमच्यापासून झाली. देशाचे प्रश्न संसदेत मांडले जावेत, अशी माझी इच्छा आहे. गरिबांना मदत करण्याचे राजकारण केले पाहिजे. आता आमची सेना संसदेत बसली आहे, आम्ही विरोधात बसून अग्निवीर योजना रद्द करण्याचा प्रयत्न करू, असे राहुल म्हणाले.
मोदींवर बोचरी टीकावाराणसीत पंतप्रधान कसेबसे वाचले. माझी बहीण प्रियंका वाराणसीतून निवडणूक लढली असती, तर भारताचे पंतप्रधान 2 ते 3 लाख मतांनी पराभूत झाले असते. हा माझा अहंकार नाही, तर भारतातील जनतेचा संदेश आहे. जनतेने सांगितले की, त्यांना द्वेष आणि हिंसा नको आहे. राम मंदिराच्या सोहळ्यात एकही गरीब, आदिवासी किंवा दलित नव्हता. तिथे फक्त श्रीमंत लोक होते, म्हणूनच त्यांनी अयोध्येची जागा गमावली, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.
राहुल पुढे म्हणतात, मोदी म्हणायचे की, देव मला काम करण्याचा आदेश देतो. पण, त्यांच्याकडे असा कोणता देव आहे, जो फक्त अब्जाधीशांसाठी काम करतो. देशातील जनतेने मोदींना संदेश दिला की, त्यांनी संविधानाला हात लावला तर आम्ही काय करू शकतो. 2014 पासून पंतप्रधान द्वेषाचे राजकारण करत आहेत आणि त्याचे फायदे दोन ते तीन अब्जाधीशांना देत आहेत. काम अजून संपलेले नाही, खुप काम बाकी आहे, असेही राहुल यावेळी म्हणाले.