काँग्रेस नेते राहुल गांधी आज शिमला दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी अचानक सोनीपतच्या बरोदा मतदारसंघातील अनेक गावांतील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये पोहोचले. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे विचार जाणून घेतले. तसेच, राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांसोबत मदिना आणि बरोजा येथे भात पिकाची लागवड सुद्धा केली. विशेष म्हणजे, यावेळी राहुल गांधी यांनी शेतात ट्रॅक्टरही चालवला.
दरम्यान, भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची लोकप्रियता वाढली आहे. सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न लोकांना आवडत आहे. कर्नाटक निवडणुकीतही असेच काहीसे पाहायला मिळाले. यादरम्यान राहुल गांधींनी डिलिव्हरी बॉईजपासून ते बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांपर्यंत अनेकांची भेट घेतली होती. आता सोनिपतमध्येही ते शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्याशी संवाद साधला.
दुसरीकडे, राहुल गांधींचा शिमला दौरा अशावेळी होत आहे, जेव्हा मोदी आडनावाच्या टिप्पणीवरून गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आणि त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली. याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार व्यक्त केला असून, तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये निदर्शने केली, शिमल्यात राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली आणि भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले. भाजप सरकार ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासोबतच पक्षाचे नेते प्रत्येक परिस्थितीत राहुल गांधींच्या पाठीशी उभे असल्याचेही सांगण्यात आले.भाजपकडून मात्र न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.