Rahul Gandhi in Wayanad: लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाडला पोहोचले. यावेळी त्यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल म्हणाले की, खासदार हा एक टॅग आणि पद आहे. भाजपवाले माझे पद काढून घेऊ शकतात आणि मला तुरुंगातही पाठवू शकतात. पण ते मला वायनाडच्या आणि देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करण्यापासून रोखू शकत नाहीत.
ते पुढे म्हणतात, मी इतक्या वर्षांपासून भाजपच्या विरोधात आहे, पण ते मला अजून ओळखू शकले नाही. त्यांना वाटलं की, माझ्या घरी पोलिस पाठवून ते मला घाबरवतील. पण त्यांनी एक वेळा नाही, शंभर वेळा घर काढून घेतले तरीदेखील मी त्यांना घाबरणार नाही. त्यांनी माझे घर काढून घेतले, याचा मला आनंद आहे. भाजपने मला ही सर्वात मोठी भेट दिली आहे. काहीही झाले तरी मी देशासाठी लढत राहीन, त्यांना प्रश्न विचारत राहीन.
संबंधित बातमी- माझा भाऊ सत्य बोलतो, तो कोणालाही घाबरणार नाही...वायनाडमधून प्रियंका गांधींची टीका
ते पुढे म्हणाले की, देशातीस लोकांमध्ये भांडण लावण्याचे आणि लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम भाजप करते. भाजपवाले जनतेला घाबरवतात. मी सरकारला प्रश्न विचारले तर त्यांना आवडत नाही. मी जेवढे प्रश्न विचारतो, तेवढे भाजपचे लोक माझ्यावर टीका करतात. आता मला माहित आहे की, हाच योग्य मार्ग आहे ज्यावर मला जायचे आहे, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.