नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. राहुल गांधी हे भारतीय नागरिक आहेत की ब्रिटिश नागरिक असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारला आहे. राहुल गांधी यांनी 2014 मध्ये स्वत:ला ब्रिटिश नागरिक सांगितलं होतं असं राव यांनी सांगितले.
जीव्हीएल नरसिम्हा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्यात ते ब्रिटिश नागरिक होते असल्याचं सांगितलं गेलंय. उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधींकडून जी कागदपत्रे जोडण्यात आली आहेत त्यातून हे समोर आलेलं आहे. अमेठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर सुनावणीसाठी सोमवारपर्यंत वेळ दिला आहे. जीव्हीएल नरसिम्हा यांनी यावर आश्चर्य व्यक्त केला. काही अपक्ष उमेदवारांनी राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा केला. यावर काँग्रेसकडून काहीच उत्तर आलं नाही. राहुल गांधी यांच्या कायदेशीर सल्लागारांनी राहुल हे भारतीय नागरिक आहेत की नाही यावर निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला त्यामुळे यावर शंका उपस्थित होत आहे.
राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुलच्या वकीलांनी वेळ मागितल्यामुळे त्यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी थांबविण्यात आल्याचं भाजपाकडून आरोप होत आहे. राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर अमेठी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार ध्रुवलाल कौशल यांनी आक्षेप नोंदवला आहे. राहुल गांधी यांचे खरे नाव राऊल विंची आहे. राहुल गांधी यांच्याकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली असून निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्यात येत आहे असा दावा ध्रुव कौशल यांच्या वकीलांनी केला.
ध्रुव कौशल यांच्या वकीलांनी आरोप केला आहे की, राहुल यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रात इग्लंडच्या कंपनीचा उल्लेख केला नाही. राहुल हे ब्रिटिश नागरिक आहेत. त्यांच्या पदवीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. राहुल गांधी यांनी ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्याचा दावा केला आहे त्या कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलंच नाही असा दावा ध्रुव कौशल यांच्या वकीलांकडून करण्यात येत आहे.