राहुल गांधी जवानांचा अपमान करीत आहेत; अमित शहा यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 04:56 AM2018-12-02T04:56:06+5:302018-12-02T04:56:22+5:30
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे लष्कराचा, त्यातील जवानांचा अपमान करीत आहेत, अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे केले.
उदयपूर : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केले, असे म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे लष्कराचा, त्यातील जवानांचा अपमान करीत आहेत, अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे केले.
प्रचार सभेत बोलताना शहा म्हणाले की, अशी विधाने करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी भारतीय जवानांच्या हौतात्म्याचा तरी विचार करायला हवा होता. भारतीय लष्कराला आकार देण्याचे, देशात राष्ट्रभक्तीचे वातावरण तयार करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. आपल्यामागे पंतप्रधान व केंद्र सरकार ठामपणे उभे असल्याचा विश्वास लष्करातील जवानांमध्ये मोदी यांच्यामुळे निर्माण झाला आहे. त्यांना या केंद्र सरकारचा व पंतप्रधानांचा अभिमान वाटतो. असे असताना राहुल गांधी या जवानांचा अपमान करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात आम्हीही सर्जिकल स्ट्राइक केले होते, असे राहुल सांगत आहेत. पण त्याची तुम्हाला माहिती आहे का, असे विचारून शहा यांनी त्याविषयी शंका व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे. खोटी माहिती पसरवणे थांबवावे, अर्थात त्यांच्या बोलण्यावर जनता विश्वास ठेवतच नाही, असे शहा म्हणाले.
राहुल गांधी यांनी राजस्थानातील काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार तरी निवडणुकांआधी जाहीर करून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी दिले. (वृत्तसंस्था)
>काँग्रेस नेत्यांना आतापासून सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. पण राजस्थानामध्येही आम्हालाच बहुमत मिळेल आणि राज्यात आमचेच सरकार येईल, याची मला
पूर्ण खात्री आहे.
-अमित शहा, अध्यक्ष, भाजपा