नवी दिल्ली :
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी ईडीकडून आठ तास चौकशी झाली. राहुल गांधी सकाळी ११.०५ वाजता मुख्यालयात हजर झाले. यावेळी त्यांची बहीण सरचिटणीस प्रियांका गांधी सोबत होत्या. ११.३० वाजता चौकशी सुरु झाली. चार तास चौकशीनंतर ३.३० वाजता ते घरी गेले. दुपारी ४.३० वाजता राहुल गांधी पुन्हा चौकशीसाठी हजर झाले. रात्री ८.३० पर्यंत ते ईडीच्या कार्यालयातच होते. बुधवारीही सलग तिसऱ्या दिवशी त्यांना चौकशीसाठी पुन्हा बोलविले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईडीने सोमवारी (दि. १३) राहुल गांधी यांची दहा तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने त्यांना मंगळवारी पुन्हा हजर होण्यास सांगितले होते. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी दुसऱ्या दिवशीही निदर्शने केली.
ज्येष्ठ नेत्यांना घेतले ताब्यात पोलिसांनी मंगळवारी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, उपनेते गौरव गोगोई, संसद सदस्य दीपेंद्र हुड्डा, नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य इम्रान प्रतापगढी व अन्य नेत्यांना ताब्यात घेतले. राहुल गांधी यांनी शेतकरी, तरुण, कामगार यांच्या प्रश्नांवर आवाज उठविला, मोदी सरकारला घेरले म्हणून केंद्र सरकार त्रस्त आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.