नवी दिल्ली-
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनस्थित केंब्रिज विद्यापीठात आपल्या भाषणात पेगासस प्रकरणावरुन मोदी सरकारवर टीका केली. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी पलटवार केला आहे. राहुल गांधी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करण्याचं काम करत आहेत. पेगासस खरंतर त्यांच्या डोक्यातच आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात जगभरात भारताचा सन्मान केला जात आहे. दिग्गज नेते मोदींचं कौतुक करत आहेत. राहुल गांधींनी कमीतकमी इटलीच्या पंतप्रधानांचं म्हणणं तरी ऐकायला हवं होतं, असं अनुराग ठाकूर म्हणाले.
"परदेशात पंतप्रधान आणि देशाची बदनामी करणे ही राहुल गांधींची सवय झाली आहे. कधी ते स्वतः करतात, तर कधी ते त्यांच्या परदेशी मित्रांना बदनामी करायला लावतात. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसची धुलाई-स्वच्छता होत आहे. देशात कुणी विचारत नाही त्यामुळे ते परदेशात जाऊन खोटं बोलत आहेत. कोर्ट-संसदेत ते माफी मागतात. ते जामीनावर सुटलेले आहेत. आपल्याला जबरदस्त पंतप्रधान मिळाले आहेत की जे महिला, मजूर, गरीब यांच्या हिताचा विचार करतात. जो परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणतो. आपत्तीत इतर देशांना मदत करतो असा हा सशक्त भारत आहे", असं अनुराग ठाकूर म्हणाले.
भारताची जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था - अनुराग ठाकूरअनुराग ठाकूर म्हणाले, 'भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. विक्रमी पातळीवर परदेशी गुंतवणूक भारतात येत आहे. राहुल गांधी मीडियाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर देशाच्या संवैधानिक संस्था आणि न्यायपालिकेची बदनामी करण्याची आणि नंतर कोर्टाची माफी मागण्याची एकही संधी ते सोडत नाहीत".
माझ्या फोनमध्ये पेगासस होता - राहुल गांधीकेंब्रिज जज बिझनेस स्कूलमध्ये (केंब्रिज जेबीएस) राहुल गांधींनी भाषण दिलं. यात त्यांनी पेगाससचा मुद्दा उपस्थित केला होता. "माझ्या स्वतःच्या फोनमध्ये पेगासस होता. अनेक बड्या नेत्यांच्या फोनमध्येही पेगासस होता. अनेक गुप्तचर अधिकार्यांनी मला फोन करून सावधपणे बोलण्याचा सल्ला दिला, तुमचा फोन पाळत ठेवत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन सतत टॅप केले जात आहेत. पेगाससच्या मुद्द्यावर त्यांनी यापूर्वीही अनेकदा सरकारला घेराव घातला आहे. माध्यमे आणि न्यायव्यवस्था नियंत्रित केली जात आहेत", असं राहुल गांधी म्हणाले होते.