Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता शेअर बाजार कोसळण्यावरुन राहुल गांधी यांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. आज राहुल यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निर्मला सीतारामण यांच्यावर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. या आरोपांवर आता भाजप नेते पीयूष गोयल यांनी जोरदार पलटवार केला. त्यांनी राहुल गांधींवर गुंतवणूकदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे.
राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेतभाजप नेते पीयूष गोयल यांनीदेखील आज पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींच्या आरोपांवर पलटवार केला. 'लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा पराभव झाल्यामुळे राहुल गांधी निराश आहेत, त्यामुळेच ते आमच्या नेत्यांवर बेछूट आरोप करत आहेत. आज भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून, संपूर्ण जग भारताला सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून स्वीकारत आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, अशी ग्वाही दिली आहे. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यामुळे राहुल गांधी नाराज झाले आहेत आणि त्यामुळेच परदेशी आणि भारतीय गुंतवणूकदारांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत,' असा आरोप त्यांनी केला.
याचा फायदा भारतीय गुंतवणूकदारांना झाला'भारतीय बाजारपेठेने मागील 60 वर्षात जेवढे मार्केट कॅप गाठले, त्यापेक्षा पाच पटीने वाढ मोदी सरकारच्या कार्यकाळात झाली. त्याचा सर्वात मोठा फायदा भारतीय गुंतवणूकदारांना, विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांना झाला. आज ते फक्त दुरुनच बाजार पाहत नाही, तर गुंतवणूक करतात आणि त्याचा थेट फायदा घेतात. UPA च्या काळात FPI ची होल्डिंग 21% होती, ती आज 16% वर आली आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा कमी झाला आहे आणि भारतीय गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात बाजार वधारत असताना परदेशी लोकांनी बाजारात विक्री केली आणि भारतीय गुंतवणूकदारांनी याचा फायदा घेतला केली. ज्या दिवशी एक्झिट पोल आला, त्या दिवशी परदेशी लोकांनी चढ्या भावाने खरेदी केली आणि भारतीय गुंतवणूकदारांनी चढ्या भावाने विक्री करून नफा कमावला,' असा दावाही त्यांनी यावेळी केला.
देशातील जनता आपले हक्क आणि न्याय मागत आहेपीयूष गोयल पुढे म्हणाले, 'मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या यशस्वी कामाचा शेअर बाजारातील भारतीय गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. त्यामुळेच आज देश आणि जगाचा भारत आणि मोदींवर विश्वास आहे. आज जनतेसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे की, राहुल गांधींनी दिलेल्या सर्व आश्वासनांचे काय झाले? देशात अनेक ठिकाणी महिला काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या आहेत. तेलंगणा, हिमाचल आणि कर्नाटकमधील काँग्रेस सरकारांना प्रति महिला एक लाख रुपये देण्याचे आश्वासन का पूर्ण करता आले नाही? महिला काँग्रेस सरकारकडे त्यांचे हक्क आणि न्याय मागत आहेत.