"जगभरात भारताचं वाढतं असलेलं महत्त्व कमी करण्याचं काम राहुल गांधी करतायंत"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 01:03 PM2023-05-31T13:03:06+5:302023-05-31T13:04:32+5:30
जग इतके मोठे आहे की कोणीही विचार करू शकत नाही की त्याला प्रत्येकाबद्दल सर्व काही माहीत आहे.
नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी अमेरिकेत पोहोचले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी भारतीयांची भेट घेत, त्यांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेबद्दल माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकाही केली. "काही महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास सुरू केला होता. मी पण प्रवास करत होतो. भारतातील राजकारणाची सामान्य साधने (जसे की जाहीर सभा, लोकांशी बोलणे, रॅली) काम करत नाहीत हे आपण पाहिलं होतं. राजकारणासाठी गरज असलेल्या साधनांवर भाजपा आणि आरएसएसचे नियंत्रण आहे. लोकांना धमक्या दिल्या जात आहेत.", असे राहुल गांधींनी यावेळी म्हटले. आता, राहुल गांधींच्या या विदेश दौऱ्यावरुन भाजपनेते आणि केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी टोला लगावलाय.
"जग इतके मोठे आहे की कोणीही विचार करू शकत नाही की त्याला प्रत्येकाबद्दल सर्व काही माहीत आहे. हा एक आजार आहे की भारतात असे काही लोक आहेत ज्यांना वाटते की त्यांना सर्वकाही माहीत आहे. मला वाटतं की त्यांना देवापेक्षा जास्त माहिती आहे. ते देवासमोर बसून त्याला काय चालले आहे ते समजावून सांगू शकतात. पंतप्रधान मोदी देखील त्यापैकी एक आहेत.", असे म्हणत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली होती. आता, भाजपकडून राहुल गांधींच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलंय. केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी विदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम करत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.
#WATCH | During his foreign visits, Rahul Gandhi insults India. PM Modi met almost 24 PMs and Presidents of the world & held over 50 meetings during his foreign visit recently and when the Australian PM said that 'PM Modi is the Boss', Rahul Gandhi could not digest this: Union… pic.twitter.com/8A1jm4DiAd
— ANI (@ANI) May 31, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात जगभरात भारताचं महत्त्व वाढत आहे. मात्र, जगात देशाचं वाढत असलेलं महत्त्व कमी करण्याचं काम राहुल गांधी विदेश दौऱ्यात करत आहेत. यापूर्वीच्या दौऱ्यातूनही त्यांनी हेच केला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदेश दौरा केला, या दौऱ्यात ते जवळपास २४ देशांच्या पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षांना भेटले, तर ५० हून अधिक बैठकांना हजेरी लावली. या दौऱ्यावेळी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले, मोदी इज द बॉस, हेच राहुल गांधींच्या पचनी पडत नाही. दोन नेत्यांच्या दौऱ्यात हा फरक असल्याचेही अनुराग ठाकूर यांनी म्हटलं.
राहुल गांधींची मोदींवर टीका
"मला वाटतं जर पंतप्रधान मोदींना देवासमोर बसायला सांगितलं तर ते ब्रह्मांडात काय चाललंय ते देवाला समजावून सांगू लागतील. देव देखील त्याने काय निर्माण केलं आहे याबद्दल गोंधळून जाईल. भारतात हेच चालू आहे. भारतात असे काही लोक आहेत ज्यांना सर्वकाही माहीत आहे. जेव्हा ते शास्त्रज्ञांकडे जातात तेव्हा ते त्यांना विज्ञानाबद्दल सांगतात, जेव्हा ते इतिहासकारांकडे जातात तेव्हा ते त्यांना इतिहासाबद्दल सांगतात. ते सैन्याला युद्ध, हवाई दलात उड्डाण करण्याबद्दल सर्व काही सांगतात. पण त्यांना काहीच कळत नाही हे सत्य आहे. कारण जर तुम्हाला कोणाचे ऐकायचे नसेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच कळू शकत नाही" असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.