जन आक्रोश रॅलीत भाजपाला घेरणार काँग्रेस, राहुल गांधी करणार जोरदार शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 07:50 AM2018-04-29T07:50:55+5:302018-04-29T08:42:38+5:30
मोदी सरकारवर दिवसेंदिवस जनतेचा वाढत चाललेल्या आक्रोशाला वाट करून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज जनआक्रोश रॅलीचं आयोजन केलं आहे.
नवी दिल्ली- मोदी सरकारविरोधात दिवसेंदिवस जनतेच्या वाढत चाललेल्या आक्रोशाला वाट करून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज जन आक्रोश रॅलीचं आयोजन केलं आहे. या जन आक्रोश रॅलीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून, भाजपालाही घेरण्याचा त्यांचा इरादा आहे. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसनं नवी दिल्लीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरूपाच्या सार्वजनिक रॅलीचं आयोजन केलं आहे.
या रॅलीमध्ये 2019 लोकसभा निवडणुकीची झलक पाहायला मिळणार आहे. काँग्रेसचे महासचिव अशोक गेहलोत म्हणाले, या रॅलीला जे नाव दिलं आहे जन आक्रोश रॅली, त्यातून एक वेगळाच संदेश आम्हाला द्यायचा आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्व स्तरांतील लोकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं चित्र निर्माण झालंय. असं भीतीदायक वातावरण, दहशतवादाचं वातावरण, तिरस्काराचं वातावरण, द्वेषाचं वातावरण, हिंसेचं वातावरण आधी कधीच नव्हतं. देशात महागाई आणि बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दराला तर आग लागलेली असून, सर्वच रेकॉर्ड तोडले आहे. मोदींनी दिलेली आश्वासनं त्यांना चार वर्षांत पूर्ण करता आलेली नाहीत. स्मार्ट सिटीचा अद्याप काहीही थांगपत्ता नाही. न्याय व्यवस्थेची स्थितीसुद्धा चिंताजनक आहे, असंही गेहलोत म्हणालेत. देशातील लोकांच्या विचारांचं प्रतिबिंब या रॅलीतून पाहायला मिळणार आहे. या रॅलीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग संबोधित करणार आहेत. या रॅलीसाठी राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तसेच रॅलीच्या आयोजनावर प्रियंका गांधी नजर ठेवून आहेत.