नवी दिल्ली: 1 फेब्रुवारीला मोदी सरकारने देशाचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. आता त्यांनी ट्विटरवरुन पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी राहुल गांधींनीचीनचा हवाला देत केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी ट्विटरवर ‘भारतासाठी जुमला आणि चीनसाठी नोकऱ्या’("जुमला फॉर इंडिया, जॉब्स फॉर चाइना") असे लिहून सरकारची खिल्ली उडवली आहे.
'सरकारने संघटित क्षेत्र उद्ध्वस्त केले'
राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटसोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये चीनमधून होणाऱ्या आयातीबाबत काही आकडेवारी सादर केली आहे. तसेच, राहुल गांधींच्या संसदेतील भाषणाची क्लिपही दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "भारतासाठी जुमला, चीनसाठी नोकऱ्या...मोदी सरकारने भारतात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण करणारे संघटित क्षेत्र आणि एमएसएमई नष्ट केले."
2021 मध्ये चीनमधून विक्रमी आयात
राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये यूपीए सरकार आणि एनडीए सरकारची आकडेवारी देण्यात आली आहे. यामध्ये 2014 पासून चीनकडून होणारी आयात कशी वेगाने वाढत आहे हे सांगण्यात आले आहे. 2021 मध्ये चीनमधून होणाऱ्या आयातीत 46 टक्क्यांनी विक्रमी वाढ झाली आहे. भारतातील बेरोजगारीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. यानंतर राहुल गांधींनी संसदेत दिलेले भाषण सुरू होते, ज्यात ते बेरोजगारीचा उल्लेख करत आहेत.