राहुल गांधी मोदींइतकेच लोकप्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:11 AM2018-05-26T01:11:20+5:302018-05-26T01:14:53+5:30
पंतप्रधानांच्या चाहत्यांची संख्या घटली : एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि लोकनीतीचा सर्व्हे
नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार शनिवारी चार वर्षे पूर्ण करीत असताना होत असली तरी मोदींच्या लोकप्रियतेत कमालीची घट झालेली दिसून येत आहे. एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि लोकनीतीने संयुक्तरित्या केलेल्या सर्व्हेनुसार नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील लोकप्रियतेत असलेली तफावत घटत चालली आहे. मागच्या एका वर्षांत जनमानसात असलेली नाराजीच्या (अँटी इन्कम्बन्सी) बाबतीत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात असलेला फरक आधीपेक्षा निम्याने घटला आहे. या सर्व्हेतील निष्कर्षांनुसार असे दिसत आहे की राजस्थान, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुका भाजपाला जड जाण्याची चिन्हे आहेत.
सर्व्हेचा हा तिसरा टप्पा आहे. १९ राज्यांमध्ये १५ हजारांहून अधिक लोकांची मते घेण्यात आली. हा सर्व्हे २० एप्रिल ते १७ मे २०१८ या कालावधीत घेण्यात आला आहे. या सर्व्हेचे आधीचे दोन टप्पे उत्तर प्रदेश व गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रकाशित करण्यात आले होते. सर्व्हेतून असे दिसून आले होते की भाजपाप्रणित एनडीएविरोधातील नाराजीमध्ये वाढत चालली आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएविरोधातील नाराजी घटत चालली आहे.
सर्व्हे असेही सांगतो की, पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना ४३ टक्के लोकांनी तर तितक्याच जणांनी राहुल गांधी यांनी पसंती दर्शविली आहे. राहुल गांधी यांची लोकप्रियता त्यांना विरोध करणाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे तर नरेंद्र मोदी यांची त्यांच्या समर्थकांमध्ये असलेली लोकप्रियता घटत चालली आहे.
25%लोक म्हणाले की, त्यांना मोदी आधी आवडत नव्हते. आता आवडत आहेत. राहुल यांच्या बाबतीत हाच आकडा २९ टक्के इतका आहे.
35%लोकांना मोदी आधी आवडत होते परंतु आता त्यांना मोदी आवडत नाहीत. राहुल गांधी यांच्या बाबतीत हे प्रमाण २२ टक्के इतके आहे.
मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेसला जनतेचे पाठबळ; भाजपापेक्षा अधिक मते
या दोन्ही राज्यांमध्ये कॉँग्रेसला भाजपापेक्षा अनुक्रमे १५ टक्के व ५ टक्के मतदान अधिक होईल, असे सर्वेत म्हटले आहे. म्हणजेच कॉँग्रेसची सत्ता दोन्ही ठिकाणी येईल.
देशातील निम्म्याहून अधिक अल्पसंख्यांक आणि दलित समाजातील नागरिक नरेंद्र मोदी सरकारला पुन्हा एकदा संधी देण्याच्या विरोधात आहेत. वरच्या वर्गातील हिंदू आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) मात्र मोदी सरकारला आणखी संधी देण्यासाठी अनुकूल दिसत आहेत. या सर्व्हेतून असा स्पष्ट निष्कर्ष निघतो की, भाजपाविरोधात जनतेत नाराजी वाढत आहे.