नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा काठमांडू येथील एका नाईट क्लबमध्ये एन्जॉय करतानाचा व्हिडीओ भाजपने सोशल मीडियातून शेअर केला होता. या व्हिडिओवरुन राहुल गांधींवर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली. तर, भाजप समर्थकांनी व्हिडिओतून त्यांना ट्रोलही केलं. त्यानंतर, नेटीझन्सकडून सध्याचे भाजप नेते आणि नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचा राहुल गांधीसमवेतचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. सध्या तो फोटो राहुल गांधीसमवेतच्या सध्याच्या नेपाळ दौऱ्याचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
भाजप समर्थकांनी राहुल गांधी यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत उभी असलेली महिला ही चीनची राजदूत असल्याचेही सांगण्यात आले होते. त्यानंतर, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी ट्विटर अकाउंटवर प्रकाश जावडेकर यांचा फोटो ट्विट केला. या फोटोत जावडेकर हातात शॅम्पेनची बॉटल ओपन करताना दिसत आहेत. यात ते पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. म्हणजेच काँग्रेसकडूनही भाजप नेत्यांवर पटलवार करण्यात आले. दरम्यानस सध्याचे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांचाही एक फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
ज्योतिर्रादित्य शिंदे यांचा राहुल गांधींसमवेतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोसह विविध कॅप्शन देण्यात येत आहेत. राहुल गांधींसह नेपाळमधील त्या लग्नसोहळ्याला ज्योतिर्रादित्य शिंदेही उपस्थित होते, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, हा फोटो जुना असून राहुल गांधींच्या सध्याच्या नेपाळ दौऱ्याशी त्याचा काहीही संबंध नाही. या फोटोत नेपाळी महिलां राहुल गांधींचा फोटो काढताना दिसत आहेत. त्या, फोटोत सिंधीयाही कोपऱ्यात असल्याचं दिसून येतं.
व्हायरल फोटोचं सत्य काय
राहुल गांधीसमेवत ज्योतिर्रादित्य शिंदेंचा व्हायरल होत असलेला फोटो 2011 सालचा आहे. त्यावेळी, ज्योतिर्रादित्य शिंदे हे केंद्रीय राज्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते होते. तर, राहुल गांधी काँग्रेसचे महासचिव होते. भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या लग्नसोहळ्यासाठी राहुल गांधी भुतानला गेले होते. वांगचुक यांनी बालमैत्रिण जेत्सुन पेमा हिच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यावेळेसचा हा फोटो असून सध्या व्हायरल होत आहे. सध्या ज्योतिर्रादित्य शिंदे हे भाजपकडून केंद्रीयमंत्री आहेत. त्यामुळेच, हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.