रायपूर : छत्तीसगडमध्ये सत्ता आल्यास 10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले होते. मात्र, निकालाच्या दिवशी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करत विरोधकांकडून ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आले होते. अखेर छत्तीसगडमध्ये राहुल यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता नव्या मुख्यमंत्र्यांनी केली असून मक्याची आधारभूत किंमत 1700 रुपयांवरून 2500 रुपये प्रती क्विंटल करण्यात आली आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासात हे दोन्ही निर्णय घेतल्याची घोषणा केली. याचबरोबर झिराम घाटीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या रॅलीवरील हल्ल्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात येणार असल्याचेही बघेल यांनी सांगितले. या नक्षलवादी हल्ल्यामध्ये वरिष्ठ नेते नंदकुमार पटेल यांच्यासह 29 जण ठार झाले होते. या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही.
मध्य प्रदेशमध्येही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनं निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. यानंतर कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी हे आश्वासन पूर्ण केलं आहे.