हुबळी : भाजपाचे कर्नाटकचे आमदार बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर बोलताना जीभ घसरली. कोण 'हिरो' आणि कोण 'जोकर' असल्याचे मतदार ठरवतील, असे वक्तव्य त्यांनी हुबळीमध्ये केले आहे.
एएनआयच्या प्रतिनिधीने विचारलेल्या एका प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. राहुल गांधी आणि कुमारस्वामी ज्या पद्धतीने बोलतात, विचार आणि देहबोलीवरून ते दुसऱ्यांच्या थट्टेचा विषय होतात. यामुळे जनताच ठरवेल की कोण 'हिरो' आणि कोण 'जोकर' असेल, असे बोम्मई म्हणाले.
कर्नाटकमध्ये काँग्रेस इंग्रजांसारखाच फोडा आणि राज्य करा हे धोरण लिंगायत समाजाच्या प्रश्नांवर वापरत आहे. लिंगायत समाजाला काँग्रेस निवडणुकीसाठी वापरत आहे. यात अपयश आले म्हणून त्यांच्याच नेत्यांकडून वेगवेगळी विधाने वदवून घेत आहे. डी के शिवकुमार हे लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा अधिकार देण्याची चूक केल्याची माफी मागत आहेत, तर एम बी पाटील ही माफी धुडकावत असून पुढील काळात हा विषय लावून धरण्याचे सांगत आहेत. काँग्रेसने आधी पक्षातील नेत्यांमध्येच ठरवावे त्यांना लिंगायत समाजाबाबत काय भुमिका घ्यायची आहे, असेही बोम्मई यांनी सांगितले.