Rahul Gandhi Leader of the Opposition :काँग्रेस नेते राहुल गांधी यांची विरोधकांनी एकमताने 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी (Leader of Opposition) निवड केली आहे. हे पद भूषवणारे राहुल गांधी, हे गांधी कुटुंबातील तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी राजीव गांधी (1989-90) आणि सोनिया गांधी (1999-2004) यांनी हे पद भूषवले होते. विरोधी पक्षनेता हा साहजिकच पंतप्रधानपदाचा दावेदार मानला जातो. आता प्रश्न पडतो की, आजवर असे किती विरोधी पक्षनेते आहेत, जे नंतर पंतप्रधान झाले.
खरं तर हे पद सुरुवातीला अस्तित्वातच नव्हते, पण 1969 मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडली, तेव्हा पहिल्यांदा हा शब्द अस्तित्वात आला. त्यावेळी काँग्रेस (ओ)चे रामसुभाग सिंह यांनी या पदासाठी दावा केला होता. 1977 मध्ये Leaders of opposition in parliament act, 1977 द्वारे या पदाला वैधानिक दर्जा देण्यात आला आणि त्यांचे अधिकार आणि सुविधा परिभाषित केल्या गेल्या.
1969 पासून 15 जण विरोधी पक्षनेते बनले आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी तीनदा, तर अटलबिहारी वाजपेयी आणि यशवंत राव चव्हाण यांनी दोनदा हे पद भूषवले आहे. तसेच जगजीवन राम, सोनिया गांधी, शरद पवार, सुषमा स्वराज यांनीदेखील हे पद भूषवले होते. यापैकी अटलबिहारी वाजपेयी वगळता कोणताही विरोधी पक्षनेता पुढे पंतप्रधान होऊ शकला नाही.
अधिकार आणि कर्तव्ये1980 आणि 2014 ते 24 दरम्यान, या पदावर कोणीही नव्हतं. लोकसभेतील एकूण खासदारांपैकी किमान 10 टक्के, म्हणजे 54 खासदार विरोधी पक्षाकडे असतील, तरच हे पद भूषवता येते. 2014 ते 2024 पर्यंत कोणत्याही विरोधी पक्षाकडे एवढे संख्याबळ नव्हते. यावेळी काँग्रेसने 99 जागा जिंकल्या आहेत, त्यामुळेच त्यांना हे पद मिळाले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे. त्यांचे शासकीय सचिवालयात कार्यालय असेल. पगार आणि भत्त्यांसह त्यांना दरमहा अंदाजे 3.25 लाख रुपये मिळतील. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी आता लोकपाल, सीबीआय प्रमुख, मुख्य निवडणूक आयुक्त आदी महत्त्वाच्या नियुक्त्यांसाठी पॅनेलवर असतील. त्याचप्रमाणे, CVC, केंद्रीय माहिती आयोग आणि NHRC प्रमुखांच्या निवडीशी संबंधित पॅनेलचे सदस्य देखील असतील. पंतप्रधान हे अशा सर्व पॅनेलचे प्रमुख असतात.