राष्ट्रपतींना आज दोन कोटी स्वाक्षऱ्यांचे देणार निवेदन, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 01:17 AM2020-12-24T01:17:17+5:302020-12-24T07:04:43+5:30
Farmers Protest : पंजाबमध्येही जोरदार विरोध नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनीही संघर्षाची भूमिका घेतली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गुरुवारी राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या कायद्यांविरोधात दोन कोटी लोकांनी स्वाक्षरी केलेले एक निवेदनही काँग्रेसकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सादर केले जाईल.
या मोर्चामध्ये काँग्रेसचे सर्व खासदार व नेते, कार्यकर्ते सहभागी होतील. नव्या कृषी कायद्यांविरोधातील निवेदनावर काँग्रेसने देशभरातून दोन कोटी लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. हे कायदे रद्द करण्यात यावेत, याकरिता राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेस पक्ष करणार आहे.
पंजाबमध्येही जोरदार विरोध नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनीही संघर्षाची भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली या कायद्यांच्या विरोधात पंजाबमध्ये ट्रॅक्टर यात्रा काढण्यात आली होती.
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवरील रस्ते गेल्या काही दिवसांपासून रोखून धरले आहेत. ठिकठीकाणी ठिय्या मांडून शेतकऱ्यांचे जथ्थे आपला असंतोष व्यक्त करीत आहेत.
विजय चौकातून रवाना होणार मोर्चा
या कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असून, त्याला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस हा मोर्चा काढणार आहे. गुरुवारी
दिल्लीतील विजय चौकातून हा मोर्चा राष्ट्रपती भवनाकडे रवाना होईल. नवीन कृषी कायद्यांबाबतची विधेयके संसदेत मंजुरीसाठी मांडली गेली, त्याच वेळेपासून या विधेयकांविरोधात दोन कोटी लोकांच्या स्वाक्षऱ्या देशभरातून गोळा करण्याची मोहीम काँग्रेसने राबवायला सुरुवात केली होती.
विशेष अधिवेशनास नकार
तिरुवनंतपुरम : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध चर्चा करण्यासाठी आणि ठराव घेण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्याची परवानगी देण्यास केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी नकार दिला आहे. विशेष अधिवेशन बोलविण्यासारखी परिस्थिती नाही, असे सांगत राज्यपालांनी यास नकार दिला आहे.