नवी दिल्ली - महाराष्ट्र व हरियाणा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला रवाना झाले आहेत. नवी दिल्लीमधून ते शनिवारी रात्री साडे आठ वाजता विमानाने रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. ट्विटरवर ही RahulInBangkok हा हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी बँकॉकहून अन्य ठिकाणीही जाऊ शकतात. मात्र कोठे जाणार याबाबत माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत राहुल गांधी यांचे नाव समाविष्ट आहे. भारतातील 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर 2015 मध्ये राहुल गांधी बँकॉकला गेले होते. महाराष्ट्र व हरियाणातील विधानसभेचे मतदान 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे व 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
देशामध्ये मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांविषयी चिंता व्यक्त करणारे खुले पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिणाऱ्या 50 नामवंतांवर गुन्हा दाखल केल्याच्या कृतीचा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र निषेध केला आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबले जाते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सध्या देशाचा प्रवास हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. देशात सध्या काय सुरू आहे हे सर्व जण पाहत आहेत. ते काही गुपित राहिलेले नाही. सगळ्या जगाला भारतातील परिस्थिती ठाऊक आहे. केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकारांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाºयांवर एकतर हल्ले चढविले जातात किंवा त्यांना अटक केली जाते. प्रसारमाध्यमांनाही चिरडण्याचा उद्योग मोदी सरकारने आरंभला आहे. या देशात दोन विचारधारा आहेत. हा देश ‘एक व्यक्ती, एक देश’ या तत्त्वानुसार चालला पाहिजे व कोणीही त्याला विरोध करता कामा नये, अशी एक विचारधारा मानते. मात्र, हे विचार काँग्रेस व विरोधी पक्षांना मान्य नाहीत. कर्नाटकमधील बांदिपूर व्याघ्र प्रकल्पातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर रात्री वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. त्याविरोधात केरळमधील वायनाड जिल्ह्यातल्या सुल्तान बाथेरी येथे उपोषण करणाऱ्या पाच युवकांची राहुल गांधी यांनी शुक्रवारी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला. तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी या युवकांना कायदेविषयक मदत देण्याचीही तयारीही राहुल गांधी यांनी दाखविली.