नवी दिल्ली:राहुल गांधी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीकडे रवाना झाले आहेत. सकाळीच त्यांनी पक्षाचे पाचसदस्यीय शिष्टमंडळ आज लखीमपूरला भेट देणार असल्याची माहिती दिली होती. पण, उत्तर प्रदेश सरकारने राहुल गांधी आणि शिष्टमंडळाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांना विमानतळावर अडवल्याची माहिती मिळाली होती. पण, आता अखेर ते लखनऊकडे रवाना झाले आहेत.
आज सकाळी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत चरणजीत चन्नी आणि भूपेश बघेल यांच्यासोबत लखीमपूर खीरीला जात असल्याची माहिती दिली होती. यानंतर काँग्रेस नेत्यांना विमानतळावरच अडवल्याची माहिती समोर आली. पण, नंतर CISF कडून या वृत्तांचे खंडन करण्यात आले. आम्ही राहुल गांधींना अडवले नाही, त्यांचे विमान 12.45 वाजता उड्डाण घेईल, असे CISF कडून सांगण्यात आले. त्यामुळे आता अखेर राहुल गांधी लखीमपूर खीरीमध्ये पीडितांना भेटण्यासाठी जात आहेत. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री चरनजीत चन्नी आणि छत्तीसगडे मुख्यमंत्री भुपेश बघेल आहेत. तर, सचिन पायलट वाहनाने तिकडे निघाले आहेत.
"शेतकऱ्यांना जीपखाली चिरडलं जातंय, त्यांची हत्या केली जातेय"आज सकाळी पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचारावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. "शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जातंय, काल पंतप्रधान लखनऊमध्ये होते पण ते लखीमपूर खिरी येथे गेले नाहीत" असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. तसेच, "शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जात आहे. त्यांची हत्या केली जात आहे. भाजपा नेत्याच्या मुलावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. दुसरीकडे पद्धतशीरपणे शेतकऱ्यांवर हल्ले केले जात आहेत" असं त्यांनी म्हटलं.
"आम्हाला मारलं, गाडलं तरी फरक पडत नाही आम्ही"ते पुढे म्हणाले, "उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना मारलं जात आहे. त्यांच्या सरकारमधील आमदारानेही बलात्कार केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नव्या प्रकारचे राजकारण होत आहे. बलात्कार, शेतकऱ्यांना मारणे सुरू आहे. जे मारतात ते जेलच्या बाहेर असतात आणि जे मरतात ते आतमध्ये जातात. पण, आम्हाला मारलं, गाडलं तरी काही फरक पडत नाही. आमचं ट्रेनिंगचं तसं झालं आहे. हा शेतकऱ्यांच्या मुद्दा आहे. त्यामुळे मी लखनऊला जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार," असंही ते म्हणाले.