संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. उद्या तिसऱ्या टप्पा पार पडणार आहे. यात राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असल्याचे बघायला मिळत आहे. यातच आता, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. यात अनेक मुद्द्यांवर भाष्य करत सरकारवर आरोपही केले आहेत. राहुल यांनी लिहिले आहे, "माझ्या प्रिय काँग्रेस कार्यकर्त्यांनो, ही निवडणूक सामान्य निवडणूक नाही. केवळ राजकीय पक्षांमधील लढाई नाही, तर आपली लोकशाही आणि आपली राज्यघटना वाचवण्याची लढाई आहे."
आपण पक्षाचा कणा -राहुल यांनी पुढे लिहिले, "एका बाजूला काँग्रेसची प्रेम आणि न्यायाची विचारधारा आहे, तर दुसऱ्या बाजूला मोदी सरकार, भाजप आणि आरएसएसची भीती, द्वेष आणि विभाजनाची विचारधारा आहे. या लढ्यात काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी ताकद आपल्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आपण उग्र आणि निर्भय आहात, कारण काँग्रेसची विचारधारा आपल्या मनात, आपल्या विचारांत आणि आपल्या कृतीत आहे. आपण पक्षाचा कणा आहात आणि आपल्याशिवाय आम्ही जिंकू शकत नाही."
"आपण आतापर्यंत केलेल्या मेहनतीबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. आपल्यामुळेच आम्ही भारतातील लोकांचे ऐकून एक क्रांतिकारी जाहीरनामा तयार करू शकलो. आपण निवडणुकीतील पहिल्या दोन टप्प्यांत चांगल्या पद्धतीने संघर्ष केला आहे. आपण भाजपच्या खोट्या आणि लक्ष भरकटवणाऱ्या गोष्टींना विरोध करण्यास सक्षम आहोत आणि त्यांना उत्तर देण्यासही भाग पाडू शकतो," असेही राहुल यांनी लिहिले आहे.
आणखी एक महिना कठोर मेहनत -"आता आणखी एक महिना कठोर मेहनत करण्याची वेळ आहे. आपली गॅरंटी प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचायला हवी. प्रत्येकाने मतदान करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. या आपण सर्व जन काँग्रेसचा संदेश आणि आपली गॅरंटी प्रत्येक गावात, मोहल्ला, गल्ली आणि घरा-घरापर्यंत पोहोचू. आता घरा घरापर्यंत पोहोचण्याची वेळ आली आहे. आपल्याला प्रत्येक तरुण, महिला, मजूर, शेतकरी आणि वंचित कुटुंबापर्यंत पोहोचावे लागेल. आपण भाजपची विचारधारा आणि त्यांच्या द्वेशाच्या अजेंड्यामुळे निर्माण झालेला धोका स्पष्ट करायला हवा. या लढाईत मी माझे सर्व काही देत आहे आणि मला आपल्याकडूनही हीच अपेक्षा आहे," असेही राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
शेवटी राहुल यांनी लिहिले, "मी जाणतो, जोपर्यंत काँग्रेसचा एकही कार्यकर्ता सत्याच्या बाजूने उभा आहे, तोवर भारतात द्वेषाचा विजय होऊ शकत नाही. आणि आपण एक नाही, तर कोट्यवधी आहोत. आपण सर्व मिळून लढू, जिंकू आणि देशाची स्थिती बदलू. आपले समर्थन, समर्पण आणि प्रेम यासाठी माझे प्रेम आणि आभार. जय हिंद"