ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 7- 15 ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसमधील संघटनात्माक निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसचं अध्यक्षपद सोडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर त्या पदावर राहुल गांधी यांची वर्णी लागणार आहे. 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे, या निवडणुकीच्या दीड वर्ष आधी राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्र दिली जाणार आहेत. मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत काँग्रेस पक्षातील अंतर्गत निवडणुकीच्या कार्यक्रमाला मंजूरी देण्यात आली. ही अंतर्गत निवडणूक प्रक्रिया 16 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
या बैठकीत सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षात बळकटी आणण्याचा आणि संघटीत निवडणुकांना गंभीरपणे पूर्ण करण्याचं आवाहन केलं. दरम्यान, काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी पदोन्नती देण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली नाही, अशी माहिती काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिली आहे. या बैठकीत संघटनात्मक निवडणुकीवर चर्चा होऊन मंजूरी देण्यात आली, असंही ते पुढे म्हणाले आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत राहुल गांधीना पक्षाचं अध्यक्ष पद द्यावं, अशी एकत्रित भावना ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली होती.
राहुल गांधी काँग्रेस पक्षात गेल्या अनेक महिन्यांपासून सक्रीय आहेत. सभा घेणं, पक्षातील नव्या नियुक्तीचा निर्णय या गोष्टी राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधींच्या पक्षातील या सक्रीयतेमुळे अध्यक्ष पद त्यांना दिलं जाणार असल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळाच रंगली आहे.
सोनिया गांधी यांच्या 18 वर्षांच्या कारकीर्दीनंतर कॉंग्रेसच्या इतिहासातील मोठं आव्हान चिन्हांकित होणार आहे. आपल्या मुलाला अध्यक्षपद देण्यासाठी सोनिया गांधी स्वतः अध्यक्षपदावरून आता लवकरच बाहेर पडतील, असंही बोललं जातं आहे. राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस पक्षाची धूरा सांभाळणारे ते पाचवे सदस्य असतील. यावर्षाच्या अखेरपर्यंत गुजरात विधानसभेच्या निवडणुकांची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमिवर राहुल गांधी यांना मिळणार अध्यक्ष पद महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असंही बोललं जातं आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला मोदींच्या कडव्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे.