नवी दिल्ली : राजस्थानमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी राजस्थानच्या झालावाड दौऱ्यावर आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सीबीआयमधील वादावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी सीबीआयमध्ये सुरु असलेला वाद आणि राफेल डील प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, 'काल रात्री चौकीदारने सीबीआयच्या संचालकांना हटविले, कारण सीबीआयच्या संचालकांनी राफेलवर प्रश्न उपस्थित केले होते.'
दरम्यान, सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा आणि सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. वर्मा यांच्या जागी एम. नागेश्वर यांची अंतरिम संचालकरदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्यांच्याकडे सहसंचालकपदाची जबाबदारी होती. नागेश्वर राव 1986 च्या ओदिशा केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
राफेलच्या चौकशीतून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न राफेल डीलमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सीबीआयकडे करण्यात आली होती. ती चौकशी पूर्ण होऊ नये, यासाठी सीबीआयमध्ये हालचाली घडवल्या जात आहेत. संचालक आलोक वर्मा यांना पदावरुन हटवण्याची कारवाई याच हालचालींचा एक भाग असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केला. वादग्रस्त अधिकारी राकेश अस्थाना यांना वाचवण्यासाठी सरकारचा खटाटोप सुरू आहे, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
सरकारला तपासाचा अधिकार नाही- जेटलीसीबीआयच्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांवरील आरोपांच्या चौकशी केंद्रीय दक्षता आयोगाच्या शिफारशीनुसार एसआयटीकडून केली जाणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबद्दलची माहिती दिली. सीबीआय देशाची प्रतिष्ठीत तपास यंत्रणा असून त्यांची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी सरकार तत्पर आहे. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी सरकारच्या कक्षेत येत नाही, असे जेटली यांनी म्हटले. सीबीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सध्या मोठं शीतयुद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रवीशंकर प्रसाद यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
(CBIvsCBI: आलोक वर्मा, राकेश अस्थाना सक्तीच्या रजेवर; नागेश्वर राव अंतरिम संचालकपदी)