नवी दिल्ली - काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार आहे असा निर्धार काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. 'काँग्रेस पक्षाला 'ग्रँड ओल्ड पार्टी' म्हटलं जातं. मात्र आगामी काळात काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार आहे. त्यासाठी तरुणांनो, एकत्र या, आपण एकतेचं आणि प्रेमाचं राजकारण करु', असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्विकारली आहेत. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र देत, सूत्रं सोपवली. यावेळी माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनी यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
अध्यक्षपद स्विकारल्यानंतर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली. 'एकदा आग लागल्यावर ती विझवणं फार कठीण, भाजपाचे लोक संपुर्ण देशात आग आणि हिंसा पसरवत आहेत. ही हिंसा रोखण्याती ताकद फक्त काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. ते आग लावतात आपण विझवतो. ते तोडतात आपण जोडतो. ते रागावतात आपण हसतो हाच नेमका फरक आहे', असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
'राजकारण जनतेसाठी आहे, पण आज राजकारणाचा उपयोग जनतेसाठी नाही, त्यांच्या विकासासाठी नाही तर त्यांना चिरडण्यासाठी होतो', असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
'भाजपशी मतभेद जरी असले, तरी भाजप कार्यकर्त्यांना आपण भाऊ किंवा बहीणच मानतो. ते आवाज दाबतात पण आपण आवाज उठवू. ते प्रतिमा मलिन करतात तर आणि आदर करतो', असे राहुल गांधींनी म्हटले.
राहुल गांधी काँग्रसचे अठरावे तर गांधी घराण्यातील सहावे अध्यक्षराहुल गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातून आलेले काँग्रेसचे सहावे अध्यक्ष आहेत. काँग्रेसच्या इतिहासात सोनिया गांधी याच सर्वाधिक काळ सलग 19 वर्ष पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत. यापूर्वी या घराण्यातील मोतीलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी दोन वेळा अध्यक्षपदाची धूरा सांभाळली होती. राहुल गांधी आता सोनिया गांधी यांच्यानंतर अध्यक्ष होणारे घरातील सहावे अध्यक्ष असतील.
स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी1) आचार्य कृपलानी – 19472) पट्टाभी सितारामय्या – 1948-493) पुरुषोत्तमदास टंडन – 19504) जवाहरलाल नेहरु – 1951-545) यू. एन. धेबर – 1955-596) इंदिरा गांधी – 19597) नीलम संजीव रेड्डी – 1960–638) के. कामराज – 1964–679) निजलिंगअप्पा – 196810) जगजीवनराम – 1970–7111) शंकर दयाळ शर्मा – 1972–7412) देवकांत बरुआ – 1975-7713) इंदिरा गांधी – 1978–8414) राजीव गांधी – 1985–9115) पी. व्ही नरसिंहराव – 1992–9616) सिताराम केसरी – 1996–9817) सोनिया गांधी – 1998 ते 201718) राहुल गांधी - 2017 पासून