काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयात डोसा बनवला. ‘विजयभेरी यात्रे’चा भाग म्हणून काँग्रेसचे खासदार करीमनगर येथून जगतियालला रवाना झाले. वाटेत नुकापल्ली बस स्टँडवर ते थांबले आणि एका भोजनालयात गेले, तिथे ते डोसा बनवणाऱ्या एका माणसाशी बोलले.
राहुल गांधी यांनी याआधी डोसा बनवण्याबद्दल विचारलं आणि मग डोसा बनवला. राहुल यांना डोसा बनवताना पाहून स्थानिक लोक आश्चर्यचकित झाले. त्यांनी डोसा बनवणाऱ्याला त्याचे उत्पन्न आणि त्याला भेडसावत असलेल्या समस्यांबद्दलही विचारले.
डोसा बनवल्यानंतर राहुल यांनी रस्त्याच्या कडेला बसून लोकांसोबत तो खाल्ला. तसेच लोकांना स्वतः बनवलेला डोसाही चाखायला लावला. यावेळी लोक खूप आनंदी दिसत होते. काँग्रेस नेत्याने ये-जा करणाऱ्यांशीही संवाद साधला आणि लहान मुलांना चॉकलेटचं वाटप केलं.
राहुल गांधी तेलंगणात तिसऱ्या दिवशीही प्रचार करत आहेत. करीमनगरमध्ये रात्रीच्या विश्रांतीनंतर ते शुक्रवारी सकाळी जगतियालकडे रवाना झाले. दिल्लीला परतण्यापूर्वी ते बस दौऱ्याचा एक भाग म्हणून आर्मूर जिल्ह्यालाही भेट देतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.