आसामला भीषण पुराचा तडाखा बसला आहे. आसाममधील २९ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे २४ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुत्रेसह राज्यातील अनेक प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. याच दरम्यान आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोमवारी आसाममधील पूरग्रस्तांची भेट घेणार आहेत.
राहुल गांधी आज मणिपूर दौऱ्यावर जात आहेत. मणिपूरला जाताना राहुल आसाममधील कछार जिल्ह्यातील सिलचर येथील कुंभीग्राम विमानतळावर पोहोचतील. येथून राहुल लखीपूर येथील पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या शिबिरात जाऊन तेथील लोकांची परिस्थिती जाणून घेणार आहेत. येथून राहुल मणिपूरमधील जिरीबाम येथे पोहोचतील.
आसाममधील पुरामुळे परिस्थिती गंभीर निर्माण झाली असून सुमारे २४ लाख लोकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. राज्यभरात ब्रह्मपुत्रेसह अनेक प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. पूर, भूस्खलन आणि वादळामुळे यावर्षी आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच गेल्या २४ तासांत आणखी आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) बुलेटिनमध्ये, धुबरी आणि नलबारी येथे प्रत्येकी दोन मृत्यू, कछार, गोलपारा, धेमाजी आणि शिवसागर येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. धुबरीमध्ये सर्वाधिक ७५४७९१ लोक बाधित झाले आहेत. राज्यातील २६९ मदत छावण्यांमध्ये ५३,६८९ लोकांनी आश्रय घेतला आहे.
नेमातीघाट, तेजपूर आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. खोवांगमधील बुरहीडीहिंग नदी, शिवसागरमधील दिखौ, नंगलामुराघाटमधील दिसांग, नुमालीगढमधील धनसिरी, धरमतुलमधील कोपिली, बारपेटामधील बेकी, गोलकगंजमधील संकोश, बीपी घाटातील बराक आणि करीमगंजमधील कुशियारा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
राहुल गांधी याआधी गुजरातमधील मोरबी अपघात आणि राजकोट गेमिंग झोन अपघातातील पीडितांना भेटण्यासाठी अहमदाबादला पोहोचले होते. तसेच राहुल यांनी नुकतीच हाथरस चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल १२१ जणांचा मृत्यू झाला आहे.