दिग्दर्शक, कलाकारांशी राहुल यांची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 05:23 AM2018-07-12T05:23:52+5:302018-07-12T05:24:38+5:30
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी तामिळ चित्रपट दिग्दर्शक पी. ए. रणजीत व कलाकार कलैयारासन यांनी भेट घेऊन राजकारण, चित्रपट व समाज विषयांवर चर्चा केली.
नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी तामिळ चित्रपट दिग्दर्शक पी. ए. रणजीत व कलाकार कलैयारासन यांनी भेट घेऊन राजकारण, चित्रपट व समाज विषयांवर चर्चा केली.
पी. ए. रणजीत व कलैयारासन यांच्यासमवेतची छायाचित्रे राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर टाकली आहेत. राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, मद्रास, कबाली, काला यासारख्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक पी. ए. रणजीत तसेच कलाकार कलैयासरन यांच्याशी उत्तम चर्चा झाली. राजकारण, समाजकारण, जातियवादाचे परिणाम या विषयांतील विविध पैलूंवर आम्ही बोललो. त्यांच्याशी मी यापुढेही असाच संवाद साधत राहीन. रणजीत यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट म्हणजे अत्ताकती. तो विनोदी चित्रपट होता. त्यानंतप् राजकारणावर आधारित मद्रास व त्यानंतर सुपरस्टार रजनीकांतची मुख्य भूमिका असलेले कबाली व काला हे दोन चित्रपट रणजीत यांनी दिग्दर्शित केले. कलैयारासन यांनी मद्रास चित्रपटात केलेल्या भूमिकेची खूप तारीफ झाली होती.
भेटीमागचे नेमके इंगित काय?
सुपरस्टार रजनीकांत यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा करुन तामिळनाडूच्या राजकारणात उडी घेतली. कमल हसन हेही राजकारणात उतरले आहेत.
रजनीकांत यांचे विचार भाजपशी मिळतेजुळते आहेत अशी बोलवा आहे. मात्र त्यांनी जाहीरपणे अजून भाजपचे समर्थन केलेले नाही. कमल हसन यांनी मात्र कोणत्याच पक्षाशी जवळीक न साधण्याची भूमिका घेतली आहे.
रजनीकांत यांच्या चित्रपटांचे दिग्दर्शक पी. ए. रणजीत हे राहुल गांधी यांना जाऊन भेटले यामागचे इंगित शोधण्याचा प्रयत्न राजकीय निरीक्षक करत आहेत.