काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी अमेरिकेत पोहोचले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी भारतीयांची भेट घेतली आणि त्यांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, "काही महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास सुरू केला होता. मी पण प्रवास करत होतो. भारतातील राजकारणाची सामान्य साधने (जसे की जाहीर सभा, लोकांशी बोलणे, रॅली) काम करत नाहीत हे आपण पाहिलं होतं. राजकारणासाठी आवश्यक असलेल्या साधनांवर भाजपा आणि आरएसएसचे नियंत्रण आहे. लोकांना धमक्या दिल्या जात आहेत."
"एजन्सी वापरल्या जात आहेत. अशा परिस्थितीत भारतात राजकारण करणं आता सोपं राहिलेलं नाही, असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही प्रवास करण्याचं ठरवलं." राहुल गांधी म्हणाले की, "जग इतके मोठे आहे की कोणीही विचार करू शकत नाही की त्याला प्रत्येकाबद्दल सर्व काही माहीत आहे. हा एक आजार आहे की भारतात असे काही लोक आहेत ज्यांना वाटते की त्यांना सर्वकाही माहीत आहे. मला वाटतं की त्यांना देवापेक्षा जास्त माहिती आहे. ते देवासमोर बसून त्याला काय चालले आहे ते समजावून सांगू शकतात. पंतप्रधान मोदी देखील त्यापैकी एक आहेत."
"भारतात असे काही लोक आहेत ज्यांना सर्वकाही माहीत आहे"
"मला वाटतं जर पंतप्रधान मोदींना देवासमोर बसायला सांगितलं तर ते ब्रह्मांडात काय चाललंय ते देवाला समजावून सांगू लागतील. देव देखील त्याने काय निर्माण केलं आहे याबद्दल गोंधळून जाईल. भारतात हेच चालू आहे. भारतात असे काही लोक आहेत ज्यांना सर्वकाही माहीत आहे. जेव्हा ते शास्त्रज्ञांकडे जातात तेव्हा ते त्यांना विज्ञानाबद्दल सांगतात, जेव्हा ते इतिहासकारांकडे जातात तेव्हा ते त्यांना इतिहासाबद्दल सांगतात. ते सैन्याला युद्ध, हवाई दलात उड्डाण करण्याबद्दल सर्व काही सांगतात. पण त्यांना काहीच कळत नाही हे सत्य आहे. कारण जर तुम्हाला कोणाचे ऐकायचे नसेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच कळू शकत नाही" असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
"द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडलं"
"प्रवास सुरू करताना वाटलं बघू काय होतंय? 5-6 दिवसांनी लक्षात आलं की हजारो किलोमीटरचा प्रवास सोपा नाही. मला माझ्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रास होऊ लागला. आमच्याकडे पर्यायही नव्हता. आम्ही रोज 25 किलोमीटरचा प्रवास करत होतो. तीन आठवड्यांनंतर एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. आपण थकून तर जात नाही ना याची जाणीव झाली. मी माझ्याबरोबर चालणाऱ्या लोकांना विचारले की ते थकले आहेत का, लोक म्हणाले की त्यांना थकवा येत नाही. आपण एकटे प्रवास करत नाही, याची जाणीव झाली होती. संपूर्ण भारत आपल्यासोबत प्रवास करत आहे. जेव्हा तुम्हाला लोकांचे प्रेम मिळते तेव्हा तुम्ही खचून जात नाही. एकत्र चालल्यावर थकवा येत नाही. द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडलं आहे" असं देखील राहुल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे.