लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या वेळी लोकांना मदत करणाऱ्या हमालांना भेटले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली तेव्हा हमालांनी लोकांना मदत करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला, मात्र सरकार त्यांचा आवाज ऐकत नाही. आम्ही त्यांच्या मागण्या सरकारसमोर ठेवू आणि त्यांच्या हक्कांसाठी सर्व शक्तीनिशी लढू असं राहुल यांनी म्हटलं आहे.
१५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. राहुल गांधींनी यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. "काही दिवसांपूर्वी मी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि तिथल्या हमाल बंधूंना पुन्हा भेटलो. चेंगराचेंगरीच्या दिवशी सर्वांनी मिळून लोकांचे जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले."
"गर्दीतून बाहेर पडण्यासाठी, जखमींना रुग्णवाहिकेत नेण्यासाठी आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी हमालांनी प्रवाशांना शक्य तितक्या सर्व प्रकारे मदत केली. या बांधवांच्या करुणेने मी खूप प्रभावित झालो आहे. ते अजूनही आर्थिक अडचणीत जगत आहे पण त्यांच्यात उत्साह आणि सद्भावना आहे. त्यांना मदतीची आवश्यकता आहे, ज्याबाबत त्यांनी त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत. मी त्यांना मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन" असं राहुल यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. ""कधी कधी आमच्याकडे जेवायलाही पैसे नसतात. आम्ही एकतर घरी पैसे पाठवू की जेवू" असं हमालांनी म्हटलं आहे. आमच्या हमाल बांधवांना अशा अडचणींमध्ये जगावं लागत आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या वेळी, यांनी लोकांना मदत करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला, परंतु त्यांचा आवाज ऐकला जात नाही. मी त्यांच्या मागण्या सरकारसमोर ठेवेन आणि त्यांच्या हक्कांसाठी माझ्या सर्व शक्तीनिशी लढेन असं" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.