राज्यातील राजकीय गोंधळ आता दिल्लीत जाऊन पोहोचला आहे. राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. यामध्ये शरद पवारांवर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या बैठकीत आठ ठराव पास करण्यात आले. यामध्ये अजित पवारांसह ९ मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर काही वेळात राहुल गांधी पवारांच्या भेटीला आले आहेत.
शरद पवारांची पत्रकार परिषद आणि काँग्रेसची पत्रकार परिषद एकाच वेळी होणार होती. यामुळे राहुल गांधी यांनी अचानक आपली पत्रकार परिषद रद्द केली होती. तिथून ते लगेचच शरद पवारांच्या भेटीला निघाले होते. राहुल गांधी शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीतील बंड, सध्याची परिस्थिती आणि पुढील रणनिती यावर चर्चा केली जाणार असल्याचे समजते.
शरद पवार यांच्यावर राष्ट्रीय कार्यकारीणीने विश्वास दर्शविला आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीने आज 8 ठराव पारित केले. समितीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि एनडीएशी हातमिळवणी केलेल्या ९ आमदारांची हकालपट्टी करण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने मान्यता दिली.