किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील १२ शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या सांगितल्या. या बैठकीला काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल, अमरिंदर सिंग राजा वारिंग, सुखजिंदर सिंग रंधावा, गुरजित सिंग औजला, धर्मवीर गांधी, डॉ. अमर सिंग, दीपेंदर सिंग हुडा आणि जय प्रकाश हेही उपस्थित होते.
शेतकरी नेत्यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, "आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कायदेशीर हमीसह एमएसपीचा उल्लेख केला आहे. आम्ही एक मूल्यांकन केलं आहे आणि ते लागू केलं जाऊ शकतं. आम्ही नुकतीच एक बैठक घेतली, ज्यामध्ये आम्ही इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांशी चर्चा करू आणि देशातील शेतकऱ्यांना MSP ची कायदेशीर हमी देण्यासाठी सरकारवर दबाव आणू."
"बैठकीपूर्वी गोंधळ उडाला होता कारण शेतकऱ्यांना आत प्रवेश दिला जात नव्हता. आम्ही त्यांना बोलावलं होतं, पण त्यांना संसदेत येऊ दिल जात नव्हतं. ते शेतकरी आहेत, कदाचित तेच कारण असेल. तुम्हाला पंतप्रधानांना याचं कारण विचारावं लागेल" असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
याआधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी त्यांच्या संबंधित राज्यांतील मुद्द्यांवर राहुल गांधींशी चर्चा केली. त्यांना MSP आणि कायदेशीर समर्थन सुनिश्चित करण्याच्या त्यांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यासाठी खासगी सदस्यांचे विधेयक सादर करण्यास सांगितलं आहे.