नवी दिल्ली - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कधी शेतकर्याच्या घरी पोहचता, तर कधी गरिबाच्या घरी जाऊन जेवण करतात. आपल्या या अचानक भेटी मुळे राहुल गांधी नेहमी चर्चेत राहिले. राहुल गांधी आता पुन्हा चर्चेत आले त्यांच्या अशाच एका भेटीमुळे, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी आपला मतदारसंघ असलेल्या वायनाडमध्ये गेले होते. यावेळी, राहुल गांधी यांनी त्यांच्या जन्मावेळी उपस्थित असणार्या नर्स राजम्मा यांची भेट घेतली. राहुल यांच्या ह्या साधेपणाने ते पुन्हा चर्चेत आले आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर राहुल गांधी पाहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. राहुल यांनी शनिवारी वायनाडच्या कालपेट्टा येथे रोड शो केला. यावेळी त्यांनी, त्यांच्या जन्मावेळी उपस्थित असणार्या नर्स राजम्मा यांची भेट घेतली. १९ जून १९७० रोजी राहुल गांधी यांचा दिल्लीतील होली या त्यांच्या फॅमिली हॉस्पिटलमध्ये जन्म झाला होता.
राहुल यांच्या जन्मावेळी त्या ठिकाणी राजम्मा ह्या नर्स होत्या. जन्म झाल्यांनतर राजम्मा यांनी राहुल यांना आपल्या हातात उचलून घेतले होते. राहुल यांनी आज अचानक भेट घेतल्याने राजम्मा यांना आश्चर्याचा धक्का बसला. राहुल गांधींना त्यांच्या हातात हात दिला. त्यांची विचारपूस केली. यासोबतच राजम्मा यांना मायेने जवळही घेतले. यावेळी राजम्मा भावूक झाल्या.
आपल्या वायनाड दौऱ्यावेळी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा टीका केली, मोदींच्या भाषणातून राग आणि द्वेष दिसून येतो. भाषण करताना त्यांनी खालची पातळी गाठली असल्याचे राहुल म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी, वायनाड येथील मतदारांचे आभार मानले.