मुंबई - राज्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह ९ आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. त्यातच, आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही पक्ष आणि चिन्ह मिळवण्यासाठी दावा केला जात असून दोन्ही गटाकडून एकमेकांना खोटं ठरवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारांची बैठक घेऊन काही नियुक्त्या केल्या. तर, अजित पवारांनी या बैठकीत तथ्य नसल्याचे म्हटले. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी, जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अचानक मोठी फूट पडल्याने शरद पवार यांना देशातील बड्या नेत्यांनी फोन करुन विचारपूस केली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही शरद पवारांना फोन करुन झाल्या घटनेबाबत विचारणा केली होती. त्यावर, आता पुन्हा लढायला निघुयात, पुन्हा जिंकूयात, असे शरद पवार यांनी सोनिया गांधींना म्हटले होते. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीसाठी पक्षाचे प्रमुख राजधानी दिल्लीत पोहोचले होते. यावेळी, राहुल गांधींनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच, राष्ट्रवादीतील फूट आणि देशातील सद्यस्थितीतील राजकारणावर चर्चा केली. त्यावेळी, जितेंद्र आव्हाड हेही शरद पवारांसमवेत होते. शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांची ओळखही करुन दिली. तेव्हा राहुल गांधींना जितेंद्र आव्हाडांना हस्तांदोलन केल्याचं पाहायला मिळालं.
९ आमदारांची पक्षातून हकालपट्टी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ९ मंत्री आणि सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि एस आर कोहली यांचे राष्ट्रवादीतून निलंबन करण्याच आल्याची घोषणा शरद पवार यांच्यावतीने पीसी चाको यांनी केली आहे. दिल्लीतील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. शरद पवार यांच्यावर राष्ट्रीय कार्यकारीणीने विश्वास दर्शविला आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीने आज ८ ठराव पारित केले. समितीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि एनडीएशी हातमिळवणी केलेल्या ९ आमदारांची हकालपट्टी करण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने मान्यता दिली.