राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, भाजपाविरोधी आघाडीसाठी खलबतं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 09:35 AM2018-03-15T09:35:40+5:302018-03-15T10:02:05+5:30
भाजपाविरोधी आघाडीसाठी राजधानीत खलबतं सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राहुल यांनी बुधवारी (14 मार्च) संध्याकाळी 6 जनपथवर जाऊन भेट घेतली.
नवी दिल्ली - भाजपाविरोधी आघाडीसाठी राजधानीत खलबतं सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राहुल यांनी बुधवारी (14 मार्च) संध्याकाळी 6 जनपथवर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी देशातील राजकीय स्थितीवर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे. फुलपूर व गोरखपूरच्या लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ही भेट झाल्यानं राजकीय गोटात चर्चांना उधाण आले आहेत. या निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भेटीदरम्यान त्यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि समाजवादी पक्षाचे खासदार नीरज शेखर उपस्थित असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. गोरखपूर व फूलपूरच्या पोटनिवडणुकीच्या मुद्याची या बैठकीत चर्चा झाली. समाजवादी पक्ष-बसपाने केलेला युतीचा फार्म्युला अन्य राज्यांतही अंमलात आणल्यास भाजपाचा पाडाव होऊ शकतो, असे पवार म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यावर राहुल यांनी काँग्रेस त्यासाठी पुढाकार घेत असल्याचे पवारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूणच भाजपाची देशभरात सुरू असलेली घोडदौड रोखण्यासाठी आता विरोधी पक्षांची एकजूट होण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.
सोनिया गांधींचीही खेळी
तर दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीदेखील विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या मेजवानीस शरद पवार, शरद यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे आता विरोधी पक्षांमध्ये एकजूट झाल्यास 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी आणि शाह या जोडगोळीविरोधात 20 पक्ष अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीला काँग्रेससह 20 पक्षांचा समावेश होता.
विविध गटांत विभागलेल्या विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी यांनी दिल्लीत निवासस्थानी मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल काँन्फ्रन्सचे ओमर अब्दुल्ला, द्रमुकच्या नेत्या कनिमोझी, सपाचे रामगोपाल यादव यांच्यासह प्रादेशिक पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी करण्यासाठी सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्ष नेत्यांना भोजनासाठी निमंत्रित केले होते.
2019 च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांना मजबूतपणे उभं करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. विरोधकांनी एकत्र येत लढल्यास मोदी लाट रोखता येईल, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. 16, 17 आणि 18 मार्च रोजी होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो.