राहुल गांधी करताहेत देशाची दिशाभूल, HALवरून निर्मला सीतारमन यांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 01:54 PM2019-01-07T13:54:05+5:302019-01-07T13:56:25+5:30
राफेल विमान करारावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेले वाकयुद्ध कायम असून, या प्रकरणामध्ये दररोज नवनवे आरोप प्रत्यारोप होत आहे.
नवी दिल्ली - राफेल विमान करारावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेले वाकयुद्ध कायम असून, या प्रकरणामध्ये दररोज नवनवे आरोप प्रत्यारोप होत आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्सला (HAL) देण्यात आलेल्या 1 लाख कोटींच्या काँट्रॅक्टच्या सत्यतेवर राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हाला प्रत्युत्तर देताना निर्मला सीतारमन यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे लोकसभेत सांगितले. सरकारने HALला एक लाख कोटी रुपयांचे काँन्ट्रॅक्ट दिले आहे. हे काँन्ट्रॅक्ट 2014 ते 18 या कालाधीसाठी आहे. दरम्यान, निर्मला सीतारमन यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधी यांनी HALमधील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न उपस्थित केला आहे.
राहुल गांधी यांनी HALला दिलेल्या काँन्ट्रॅक्टबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत त्याबाबत स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने HALला एक लाख कोटी रुपयांचे काँन्ट्रॅक्ट दिले आहे. हे काँन्ट्रॅक्ट 2014 ते 18 या कालाधीसाठी आहे. तसेच याबाबत HAL कडूनही दुजोरा मिळाला आहे. 2014 ते 2018 या काळात 26 हजार 570 कोटींच्या करारांवर सह्या झाल्या आहेत. तर 73 हजार कोटींच्या करारांबाबत प्रक्रिया सुरू आहे.
Defence Minister in Lok Sabha: I have received confirmation from HAL that contracts during 2014-18 worth Rs 26,570.80 crore have already been signed with HAL. Orders worth Rs 73,000 Cr approx are in the pipeline pic.twitter.com/UeWFQ2Gc37
— ANI (@ANI) January 7, 2019
दरम्यान, निर्मला सीतारमन यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर राहुल गांधी यांनी HAL मधील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न उपस्थित केला आहे. HALकडे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी पैसे नाहीत. ही धक्कादायक नाही काय? पगाराविना HAL मधील गुणवान कर्मचाऱ्यांना AA च्या कंपनीची वाट धरावी लागेल, " असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. दरम्यान, लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही HAL वरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, जर HALशी करार झाले आहेत. तर कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी त्यांच्याकडे का पैसे नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे.