नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी हिंदीमधून एक सहा कलमी उपरोधिक ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी योजनेची मार्मिकपणे खिल्ली उडविली.
राहुल गांधीचे हे ट्विट असे :
‘‘कोरोना काळात सरकारची कामगिरी : फेब्रुवारी- ‘नमस्ते ट्रम्प’मार्च- मध्यप्रदेशचे सरकार पाडलेएप्रिल- मेणबत्त्या लावल्यामे- सरकारची सहावी वर्षपूर्तीजून- बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅली
जुलै- राजस्थान सरकार पाडण्याचे प्रयत्न यामुळेच देश कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘आत्मनिर्भर’ आहे.’’ राहुल गांधी गेले काही दिवस दररोज एक टष्ट्वीट करून मोदींवर सडकून टीका करीत आहेत. सोमवारच्या ट्विटमध्ये त्यांनी ‘मोदींनी सत्तेसाठी स्वत:ची ‘कणखर नेत्या’ची खोटी प्रतिमा निर्माण केली’, असा घणाघाती आरोप केला होता.
‘अशाने काँग्रेस टष्ट्वीटपुरती शिल्लक राहील’
राहुल गांधी यांच्या या दैनिक ट्विट हल्ल्याला भाजपतर्फे केंद्रीय माहितीमंत्री प्रकाश जावडेकर यांनी खरमरीत उत्तर दिले. पत्रकारांशी बोलताना जावडेकर म्हणाले, लोकांसाठी काहीही काम करीत नसल्याने एकेक नेता काँग्रेस सोडून जात आहे आणि राहुल गांधी दररोज फक्त टष्ट्वीट करीत आहेत. अशाने काँग्रेस फक्त टष्ट्वीटपुरतीच शिल्लक राहील, असे दिसते. हताश व निराश झालेला हा पक्ष सैरभैरपणे सरकारवर आरोप करीत आहे.