National Herald Case Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी सलग तीन दिवस सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) कार्यलयात हजेरी लावली. सोमवारी राहुल गांधी यांची सुमारे आठ चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी सलग दोन दिवस पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या मुद्द्यावरून राजकारण तापलं असून काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. याच दरम्यान काँग्रेसच्या एका महिला नेत्याने थेट पोलिस कर्मचाऱ्याची कॉलरच पकडल्याचे दिसून आले.
राहुल गांधी यांना ईडी चौकशीला बोलवल्यापासून काँग्रेसचे नेतेमंडळी शक्य त्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहेत व निषेध नोंदवत आहेत. राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडापोटी ही कारवाई केली जात आहे असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. अशा वेळी काँग्रेसच्या महिला नेत्या रेणुका चौधरी यांनी थेट पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडल्याची घटना घडल्याचे दिसून आले. तेलंगणा मध्ये काँग्रेसकडून जोरदार निदर्शने करण्यात येत होती. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी या आंदोलनकर्त्यांना शांत राहण्याचे आव्हान केले. तरीही कार्यकर्ते ऐकत नसल्याने पोलिसांनी त्यांना त्या स्थळावरून हटवण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान हा प्रकार घडला. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी बुधवारी रात्री ९ वाजेपर्यंत ईडीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी केली. राहुल गांधी रात्री ९.३० वाजता ईडी कार्यालयातून बाहेर आले. चौकशीत सहभागी होण्यासाठी राहुल तिसऱ्यांदा ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते. ईडीच्या कारवाईच्या विरोधात बुधवारी काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर, राहुल गांधींना या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवल्याचा आरोप केला. राहुल गांधी सरकारला प्रत्येक आघाडीवर प्रश्न करत आहेत, त्यामुळे सरकार त्यांना त्रास देतंय, असा सूर काँग्रेस नेत्यांकडून दिसला.